मुंबई : राज्यातील वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या झाल्या आहेत. ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांसह अनेक वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या झाल्या आहेत. ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांची महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे तर ठाण्याचे जिल्हाधिकारी म्हणून राजेश शिंगारे यांची नियुक्ती झाली आहे. ठाण्याच्या महापालिका आयुक्तपदी अभिजीत बांगर यांची नियुक्ती झाली आहे. अभिडीत बांगर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतले अधिकारी म्हणून ओळखले जातात.
नवी मुंबईचे महापालिका आयुक्त अभिजीत बागंर यांची ठाणे महापालिका आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. तर, शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर यांची नवी मुंबई महापालिका आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतले अधिकारी म्हणून देखील अभिजीत बांगर यांची ओळख आहे. आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांची ही मोठी खेळी मानली जात आहे.
राज्यात एकनाथ शिंदे यांचं सरकार आल्यापासून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्याचं सत्र देखील सुरु आहे. आज राज्यातील ४४ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असलेल्या ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि ठाणे महापालिकेचे आयुक्त बदलण्यात आले आहेत. मनीष पाटणकर म्हैसकर यांची पर्यावरणीय आणि वातावरणीय बदल मंत्रालयाच्या प्रधान सचिव पदावरुन बदली करुन त्यांना मुख्य राजशिष्टाचार अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मराठी भाषा विभागाची अतिरिक्त जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.
मिलिंद म्हैसकर यांची गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव पदावरुन बदली करुन त्यांना नागरी उड्डाण, मान्य प्रशासन विभाग, उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, तुकाराम मुंढे यांची राज्य मानवी हक्क आयोग मुंबई च्या सचिव पदावरुन राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सत्तेत आल्यापासून शिंदे-फडणवीस सरकारने धडाकेबाज निर्णयांचा सपाटा लावला आहे. गुरुवारी सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला. राज्यातील बड्या सनदी अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. रात्री उशिरा बदल्यांचे आदेश जारी केले. औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नाशिकच्या आयटीडीपीचे प्रकल्प अधिकारी विकास मीना यांना नियुक्तीचे आदेश दिले आहेत.
जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची बदली नांदेडच्या जिल्हाधिकारीपदी करण्यात आली. तर वर्धा जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे यांची बदली उस्माबादचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली. लातूर महापालिकेचे आयुक्त अमन मित्तल यांची बदली जळगावच्या जिल्हाधिकारीपदी करण्यात आली. डहाणूच्या प्रकल्प अधिकारी अशिमा मित्तल यांना नाशिक जि.प. सीईओ म्हणून नियुक्ती देण्यात आली. तर नाशिकच्या आयटीडीपी प्रकल्प अधिकारी वर्षा मीना यांच्याकडे जालना जि. प. सीईओ म्हणून पदभार देण्यात आला आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे समजले जाणारे मुंबई मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल यांची बदली झाली नाही. मात्र, अभिजित बांगर यांच्या जागी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची नवी मुंबई मनपा आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.