पुणे : शिवसेनेचे बंडखोर नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आत्मघाती स्फोटाद्वारे उडवून देण्याचा कट शिजत आहे, अशा प्रकारचा फोन करून मुख्यमंत्र्यांच्या हत्येची धमकी देणारा तरुण लोणावळा पोलिसांनी जेरबंद केला आहे. हा तरुण मूळचा आटपाडीचा राहणारा असून, केवळ धाब्याच्या मालकाला धडा शिकविण्यासाठी त्याने हा खटाटोप केला. कारण, धाबा मालकाने १० रुपयाची पाणी बॉटल १५ रुपयांना विकल्याचा त्याला राग आलेला होता. तरीही या तरुणाची पोलिस कसून चौकशी करत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला करण्याच्या कटाची खोटी माहिती पोलिसांना देणार्या तरुणाला लोणावळा पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या सहाय्याने अटक केली आहे. अजय वाघमारे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, तो मूळचा आटपाडीचा रहिवासी आहे. वाघमारे हा मुंबईला जात असताना लोणावळ्यातील एका धाब्यावर जेवण करण्यासाठी थांबला होता. या धाब्याच्या मालकाने त्याला दहा रुपयाची पाण्याची बॉटल पंधरा रुपयाला दिल्याने त्याचे डोके सरकले होते. या धाब्याच्या मालकाला कामाला लावण्यासाठी वाघमारे याने थेट सीएमच्या जीवे मारण्याच्या कटाबाबतचा पोलिसांना खोटा कॉल केला. पोलिसांना खोटी माहिती देऊन यंत्रणेची धावपळ उडवणार्या वाघमारेवर लोणावळा शहर पोलिसात विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला जेरबंद केले आहे. पोलिस त्याच्याकडून कसून तपास करत आहेत.