मुंबई : शिवतीर्थावर होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा दुसरा टिझर आज प्रदर्शित करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आवाजातील या टिझरमध्ये बंडखोरांना धडा शिकवण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, मर्द अशाच लढाईची वाट पाहत असतो. त्यामुळे दसरा मेळाव्याला उत्साहात या, वाजतगाजत या, पण शिस्तीत या, असे आवाहन करण्यात आले आहे.
टिझरमध्ये म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवले आहे की कुणाच्या पाठीत वार करायचा नाही. मात्र, कुणी पाठीत वार केल्यास त्याचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहायच नाही. त्यानंतर शिवसैनिकांना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणतात, आज माझ्या हातामध्ये काय आहे. अधिकार म्हणून काहीच नाही. मात्र तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाच्या रुपाने मिळालेली एक शक्ती आहे. ती शक्ती घेऊनच पुढे चाललो आहे, लढायला चाललो आहे.
टिझरमध्ये म्हटले आहे की, शिवसेनेवर सर्व एकत्र येऊन तुटून पडले आहेत. मात्र राज्यातील लाखो शिवसैनिक हेच ठाकरे कुटुंबीय आहे. हे कुटुंब संपवा. यांच्या प्रत्येकाच्या मनात हिंदूह्रदय बाळासाहेब टाकरे आहेत. शिवसेनेविरोधात सगळे एकत्र आलेत. खरा मर्द अशाच लढाईची वाट पाहतो. आम्ही त्याच लढाईची वाट पाहतोय. त्यामुळे दसरा मेळाव्याला उत्साहात या, वाजतगाजत या, गुलाल उधळत या, पण शिस्तीत या.