संस्कारांच्या माध्यमातून हिराबाई लांडगे यांचे अस्तित्व निरंतर !
ह. भ. प. धर्माचार्य ॲड. शंकर महाराज शेवाळे यांचे प्रतिपादन
पिंपरी : निर्मिकाच्या इच्छेशिवाय जगात आपण काहीही नष्ट करु शकत नाही किंवा निर्माणही करु शकत नाही. केवळ परिवर्तीत करु शकतो. जीवन हे एक चक्र आहे. यामध्ये शरीर आणि माणूस ओळखले पाहिजे. माणसं माणसांना ओळखत नाहीत. आज हिराबाई लांडगे शरीररुपी आपल्यातून निघून गेल्या असल्या तरी, संस्कारांच्या रुपाने आमदार महेश लांडगे, कामगार नेते सचिन लांडगे आणि उद्योजक कार्तिक लांडगे यांच्यासोबत निरंतर अस्तित्वात राहतील, असे प्रतिपादन ह.भ.प. धर्माचार्य ॲड. शंकर महाराज शेवाळे यांनी केले.
आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री कै. सौ. हिराबाई लांडगे यांचे दि. २४ सप्टेंबर रोजी निधन झाले. भोसरी गावातील तळ्याकाठी सोमवारी सकाळी दशक्रिया विधी करण्यात आला. यावेळी शेवाळे यांचे प्रवचन झाले.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रकाश मिटभाकरे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार सुनील शेळके, दिलीप मोहिते, भीमराव तापकीर, माजी आमदार बप्पूसाहेब पाठारे, यांच्यासह मान्यवरांनी शोकसंदेश व्यक्त करीत आदरांजली वाहिली. यावेळी पुणे जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी यांच्यासह विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. मातोश्री हिराबाई लांडगे यांच्या स्मरणार्थ लांडगे कुटुंबियांच्या वतीने विविध सामाजिक, अध्यात्मिक संस्थांना मदत निधी देण्यात आला.
ह.भ.प. धर्माचार्य ॲड. शंकर महाराज शेवाळे म्हणाले की, आईच्या संस्कारामुळेच मुले घडत असतात. आईचे संस्कार मुलांमध्ये परावर्तित होतात. सामान्य मुलगा असामान्य कर्तुत्व करुन महाराष्ट्रात लौकीक कमावते. हे संस्काराशिवाय अशक्य आहे. घरची परिस्थिती जेमतेम असताना मुलगा पैलवान घडवावा, अशी महत्त्वाकांक्षा ठेवणाऱ्या हिराबाई लांडगे यांच्यासारखी कर्तुत्वसपन्न् आई सर्वांना लाभत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, विनोबा भावे अशी माणसं आईच्या संस्कारामुळेच घडली.
सूत्रसंचालन नाना शिवले यांनी केले. लांडगे कुटुंबियांच्या वतीने माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांनी ऋण व्यक्त केले. पसायदान पठण करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.