पिंपरी : जमिनीची परस्पर विक्री करुन 15 कोटी रुपयांची अपहार, फसवणूक केल्याबाबत पिंपरी चिंचवड शहरातील भाजपचे पदाधिकारी राजेश पिल्ले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पुणे पोलिसांच्या चंदन नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणी संजय दयानंद ओसरमल (39, रा. रमाबाई नगर ,लिंक रोड पिंपरी) यांनी फिर्याद दिलेली आहे. तर पिंपरी चिंचवड भाजपचे पदाधिकारी रामकृष्ण गोविंदस्वामी पिल्ले उर्फ राजेश पिल्ले (52, रा. सर्वे नंबर 3/7,प्लॉट नंबर 302, अजमेरा हाऊसिंग कॉलनी पिंपरी) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना वडगाव शेरी पुणे येथे 05/02/2019 ते माहे मे 2022 पर्यंत घडली आहे. गुन्हा 07/10/2022 रोजी दाखल झालेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; राजेश पिल्ले हे ब्रह्माकॉर्प लिमिटेड तर्फे अधिकृत संचालक रामकुमार अग्रवाल यांचेतर्फे जमीन खरेदी विक्री व्यवहारांमध्ये प्रिसिपल एजंट ( विश्वस्त प्रतिनिधी )म्हणून काम करत आहेत. त्यांनी चऱ्होली बुद्रुक, ता हवेली, जिल्हा पुणे येथील सर्वे नंबर 210 हिस्सा नंबर 6 मधील एकूण 95 आर ही मिळकत कंपनीचे संचालक रामकुमार ब्रह्मदत्त अगरवाल यांना कोणतेही पूर्वकल्पना न देता परस्पर संतोष सोपानराव लांडगे आणि धनंजय हनमंत लांडगे यांना खरेदीखताने विक्री केली. पिल्ले यांनी ब्रह्माकॉर्प कंपनीचा विश्वासघात करून 15 कोटी रुपयाचा अपहार करून आर्थिक फसवणूक केली आहे म्हणून तक्रार देण्यात आलेली आहे. तपास पोलीस करत आहेत.