पिंपरी : आर्थिक अडचणीत असलेल्या पिंपरीतील सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँकेचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) परवाना रद्द केला आहे. त्याबाबतचा आदेश आज (सोमवारी) काढला आहे. आजपासून बँकेने बँकिंग व्यवसाय करणे बंद झाले आहे. त्यामुळे खातेदारांची चिंता वाढली आहे.
सेवा विकास बँक पिंपरीतील मोठी बँक होती. पिंपरी कॅम्पातील आर्थिक उलाढालीचे बँक मुख्य केंद्र होते. सेवा विकास बँकेतील कथित आर्थिक घोटाळ्यामुळे मोठे वादंग सुरु आहे. त्यातच बँकेचा परवाना रद्द झाला आहे. आरबीआयचे मुख्य महाव्यवस्थापक योगेश दयाल यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईच्या शक्यता नाहीत. त्यामुळे बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या विविध तरतुदींचे पालन करण्यात बँक अयशस्वी ठरली आहे.
बँकिंग कायद्यान्वये बँकेचे कामकाज चालू ठेवणे तिच्या ठेवीदारांच्या हितासाठी प्रतिकूल आहे. बँकेची सध्याची आर्थिक स्थिती ही तिच्या सध्याच्या ठेवीदारांना पूर्ण पैसे देऊ शकणार नाही. बँकेला बँकिंग व्यवसाय चालू ठेवण्याची परवानगी दिल्यास सार्वजनिक हितावर प्रतिकूल परिणाम होईल.
परवाना रद्द केल्यामुळे बँकिंग नियमन कायदा 1949 अन्वये बँकेला ठेवी स्वीकारणे आणि ठेवींची परतफेड करणे यांचा समावेश असलेल्या ‘बँकिंग’चा व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. बँकेमध्ये रक्कम अडकून पडलेल्या ठेवीदार, खातेदारांना आता ठेवी विमा महामंडळाच्या योजनेनुसार (डीआयसीजीसी) रुपये पाच लाखांपर्यंतच्या आर्थिक मर्यादेपर्यंतच्या ठेवींच्या ठेव विमा दाव्याची रक्कम प्राप्त करण्याचा अधिकार आहे. बँकेच्या संबंधित ठेवीदारांकडून प्राप्त झाल्रेल्या रक्कम मिळण्याच्या अर्जावर विमा उतरविलेल्या ठेवीपैकी 14 सप्टेंबर 2022 अखेर 152 कोटी 36 लाख रुपयांच्या ठेवींची रक्कम यापूर्वीच संबंधितांना सर्व पूर्तता करुन देण्यात आल्याचे पत्रात स्पष्ट म्हटले आहे.