ऋतुजा लटके यांना उच्च न्यायालयाचा दिलासा; अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा

0

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीतील ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत लटके यांना राजीनामा स्वीकारल्याचे पत्र द्या, असे आदेश हायकोर्टाने मुंबई पालिकेला दिले आहेत.

न्यायालयाच्या निकालामुळे ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी लटके उद्या ठाकरे गटातर्फे उमेदवारी अर्ज भरतील. अर्ज भरण्याचा उद्या अखेरचा दिवस आहे.

ऋतुजा लटके यांचा राजीनामा पालिकेने मंजूर न केल्यामुळे लटके यांना अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरता येत नव्हता. त्यामुळे मुंबई पालिकेविरोधात ठाकरे गटाने हायकोर्टात धाव घेतली होती. आज या प्रकरणावर न्यायमुर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. ऋतुजा लटके यांच्यातर्फे अॅड. विश्वजित सावंत तर, मुंबई पालिकेतर्फे अॅड. अनिल साखरे यांनी बाजू मांडली.

सुनावणीदरम्यान राजकीय दबावापोटीच ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई पालिकेने अद्याप मंजूर केला नाही, असा आरोप लटके यांच्या वकिलांनी केला. तर, ऋतुजा लटके यांच्याविरोधात कालच म्हणजे 12 ऑक्टोबररोजी पालिकेकडे एक भ्रष्टाचाराची तक्रार आली आहे. ही केस प्रलबिंत आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा मंजूर केला नाही, असे मुंबई पालिकेतर्फे सांगण्यात आले.

लटकेंच्या वतीने अॅड. विश्वजित सावंत यांनी सांगितले की, ऋतुजा लटके यांनी सर्वप्रथम 27 सप्टेंबररोजी राजीनामा दिला होता. मात्र, पालिकेने अद्याप या राजीनाम्यावर अभिप्राय दिलेला नाही. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी लटके यांना उमेदवारी अर्ज भरायचा आहे. 14 ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची अखेरची तारीख आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लटके यांच्याकडे आता केवळ एक दिवस उरला आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यावर वेगाने प्रक्रिया पार पडणे अपेक्षित आहे. कोर्टाने लवकरात लवकर याप्रकरणी निकाल द्यावा, अशी विनंती लटकेंतर्फे करण्यात आली होती.

अॅड. विश्वजित सावंत यांनी सांगितले की, ऋतुजा लटके यांचे पती रमेश लटके हे अंधेरी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. रमेश लटके यांच्या निधनानंतर ऋतुजा लटके यांना या जागेवरुन पोटनिवडणुकीसाठी उभे रहायचे आहे. ऋतुजा लटके या मुंबई पालिकेत लिपिक पदावर कार्यरत आहेत. निवडणुकीसाठी त्यांनी नियमाप्रमाणे मुंबई पालिकेचा प्रथम 27 सप्टेंबरला राजीनामा दिला. मात्र, एक महिना पालिकेने त्यांना प्रतिसादच दिला नाही.

अॅड. सावंत पुढे म्हणाले की, एका महिन्यानंतर लटके यांना पुन्हा राजीनामा देण्यास मुंबई पालिकेतर्फे सांगण्यात आले. तेव्हादेखील लटके यांनी नियमाप्रमाणे 3 ऑक्टोबरला नव्याने राजीनामा दिला. ऋतुजा लटके यांच्यावर पालिकेची कोणतीही थकबाकी नाही. लटके यांनी आपला एका महिन्याचा पगारही पालिकेकडे दिला आहे. केवळ राजकीय दबावापोटी त्यांचा राजीनामा थांबवला जात आहे. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप लटकेंच्या वतीने करण्यात आला आहे.

लटकेंच्या वकीलांनी बाजू मांडल्यानंतर हायकोर्टाने मुंबई पालिकेला विचारले की, एखाद्या पालिकेच्या कर्मचाऱ्याला निवडणूक लढवायची असेल तर तुम्हाला अडचण काय? लटकेंच्या राजीनाम्यावर तातडीने निर्णय घेणार की नाही? तसेच, राजीनाम्याबाबत निर्णय घेतल्यास तो काय घेतला, हेदेखील लगेच कळवण्यास हायकोर्टाने सांगितले होते.

दोन्ही बाजू ऐकल्यानंतर हायकोर्टाने ऋतुजा लटके यांच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा आहे. उद्या वाजतगाजत शेकडो शिवसैनिकांच्या साक्षीने लटके यांचा उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे शिवसेना नेते अनिल परब यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.