मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर रात्री उशिरा ही भेट झाली. ही बैठक 15 ते 20 मिनिटे चर्चा झाली असून नेमके कोणत्या विषयावर त्यांची ही भेट झाली हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसूल केल्याचा आरोप केला होता. देशमुख यांना जामीन मिळाल्याने त्यांचा बाहेरचा येणेचा मार्ग सोपा होत आहे, त्यामुळे परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणे महत्त्वाचे मानले जात आहे. यामुळे आता पुन्हा अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेले अनेक दिवस गायब असलेले माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह हे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जामीनाची सुनावणी झाल्यावरच दिसून आले. यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधान आले आहे. परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. इतकेच नाही तर, या प्रकरणात देशमुखांना 11 महिने जेलमध्ये रहावे लागले आहे. तर या सर्व प्रकरणामध्ये परमबीर सिंह यांचे महाविकास आघाडी सरकारच्या काळात निलंबन देखील झाले. यानंतर आता परमबीर सिंह पुन्हा जोरदार कमबॅक करणार अशी चर्चा सुरू झाली असून त्या अनुरूषंगाने या भेटीला अधिक महत्त्व आले आहे.