पुणे : वानवडी परिसरातून पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक एक यांनी शाहरुख खान व त्याचा साथीदार यांना सुमारे तीन लाखांच्या अंमली पदार्थासह अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.13) वानवडी येथूल लुल्लानगर परिसरात करण्यात आली.
मतीन हुसेन मेमन (21, रा.कोंढवा) व शाहरुख कादीर खान (29, रा.कोंढवा) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना लुल्लानगर येथे सार्वजनिक रोडवर दोघे संशयीत रित्या उभे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.पोलिसांनी त्यांची चौकशी करत अंगझडती घेतली असता त्यातील मतीन याच्याकडे 1 लाख 52 हजार 100 रुपयांचे 10 ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन (एम.डी.) तर शाहरूख खान कडे 1 लाख 51 हजार 800 रुपयांचे 10 ग्रॅम 120 मिली ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन तसेच एक मोबाईल व दुचाकी असा एकूण 3 लाख 63 लाख 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हे अंमली पदार्थ आरोपींनी अनमोलसिंग मनचंदा सिंग (वय 33 रा.एनआयबी रोड, पुणे) याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. मतीन व अनमोलसिंग व शाहरुख यांच्या विरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून वानवडी पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.
ही कारवाई अमंली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा एक चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर, लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अमंलदार मनोजकुमार साळुंके, योगेश मोहिते,विशाल दळवी, संदिप शिर्के,पांडुरंग पवार, सचिन माळवे, प्रवीण उत्तरेकर, राहूल जोशी, संदेशकाकडे, रेहना शेख, नितेश जाधव यांनी केली.