मुंबई : पोलिस यंत्रणेच्या साह्याने मला अडकवण्याचे, माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून अटक करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. एलसीबीचा एक पोलिस जामनेरचा आहे, त्याची माहितीही मला शेअर केली आहे.
भाजपमधून राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज एक गौप्यस्फोट केला आहे. आपल्या अटक करण्यासाठी मोठे षडयंत्र रचण्यात येत असल्याचा दावा खडसे यांनी केला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
एकनाथ खडसे म्हणाले की, मला एका पोलिस अधिकाऱ्याचा फोन आला होता. त्याने सांगितले की, पोलिस यंत्रणेच्या सहाय्याने तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करून अटक करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. पोलिस अधिकाऱ्याने आपल्याला काही नावेही सांगितले.
जामनेरच्या पोलिस अधिकाऱ्याच्या माध्यमातून हे षडयंत्र रचण्यात येत असल्याचा आरोपही खडसे यांनी केला, असा गोप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आज केला.
खडसे म्हणाले की, जळगावमध्ये एकनाथ खडसे अडसर ठरत आहे. त्यामुळे सुडाचे राजकारण सुरू आहे. जळगावमध्ये एकनाथ खडसे उभे असले की, यांना एकही निवडणूक जिंकता येऊ शकत नाही. त्यामुळे अशाप्रकारे अटक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र आपल्यासोबत असे यापूर्वीही घडले आहे. त्यामुळे या धमक्यांना आणि षडयंत्रांना आपण घाबरणार नाही.