मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नोव्हेंबरमध्ये अयोध्येला जाऊन प्रभू श्री रामाचे दर्शन घेणार आहेत.
शिंदे यांच्यासोबत अयोध्या दौऱ्यात शिंदे गटातील काही मंत्री व आमदारही असणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ येथे पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.
पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले की, मी निश्चितपणे अयोध्येला जाणार आहे. माझ्यासोबत पक्षाचे काही मंत्री, आमदारही असतील. मी यापूर्वीही अयोध्येला गेलो आहे. मात्र, त्यावेळी मी मुख्यमंत्री नव्हतो. आता मुख्यमंत्री म्हणून अयोध्येला जात प्रभू श्री रामाचे दर्शन घेणार आहे.
विशेष म्हणजे शिंदे यांच्या बंडापुर्वी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचे नियोजन हे एकनाथ शिंदे यांनीच केले होते. तेव्हा आदित्य ठाकरेंसोबत जे काही मोजके नेते गेले होते, त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता. त्यावेळी अयोध्येतून आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली. शिवसेनेतील जवळपास 40 आमदारांनाही ते सोबत घेऊन गेले.
दरम्यान, अयोध्या दौऱ्यात शिंदे गटासोबत भाजपचे काही नेतेही जाणार असल्याची माहिती आहे. राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भातील घडामोडींना वेग आला आहे. दिवाळीनंतर मंत्रिमंडळचा विस्तार झाल्यानंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजप गटाचे मंत्री अयोध्येत जाऊन शक्तीप्रदर्शन करणार, अशी सूत्रांची माहिती आहे.