मुंबई : देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. कोरोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनी सगळीकडे दिवाळीचा उत्साह दिसून येतोय. लोकं मोठ्या प्रमाणात बाहेर पडून खरेदी करताना दिसतायत, बाजारपेठा पुन्हा एकदा गर्दीने फुलून गेल्या आहेत.
त्यातच दिवाळी म्हटलं की सोनं-चांदी खरेदीकडे कल दिसतो. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर अनेक जण सोनं खरेदीला प्राधान्य देतात. यंदा कोविड महामारीनंतरही सोनेबाजाराला झळाळी आली आहे.
दिवाळीच्या मुहूर्तावर नागरिकांनी सोने खरेदीला प्राध्यान्य दिल्याचं दिसतंय. यंदा सोनेबाजारात करोडो रुपयांची उलाढाल झाल्याचं पाहिला मिळतंय. एकट्या मुंबईत चार दिवसात 40 टन विक्री झाली आहे. म्हणजेच जवळपास 20 हजार कोटी विक्री झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी ही माहिती दिली आहे.
2017 मध्ये 21 टन सोन्याची विक्री झाली होती. 2018 मध्ये 25 टन, 2019 ला 28 टन, 2020 ला कोविड महामारी आली होती त्यावेळी 15 टन विक्री झाली झाली होती. त्यानंतर 2021 ला कोविडचे निर्बंध उठल्यावर 30 टन सोन्याची विक्री झाली होती. तर यावर्षी म्हणजे 2022 ला विक्रमी सोने विक्री झाली आहे. गेल्या 4 दिवसात 40 टन सोने गेले असून पुढील दोन दिवसात अजून 10 टन सोन्याची विक्री होण्याचा अंदाज आहे यावर्षी लग्न सराईचे मुहूर्त आणि भावातील कमी जास्त चढ उतार यामुळे अजून सोने विक्री होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सोन्यात गुंतवणूक करणं सुरक्षित आणि फायदेशीर मानलं जातं. धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर अनेक जण सोनं खरेदी करतात.