पुण्याजवळ होणार इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर; केंद्र सरकारची घोषणा

0

नवी दिल्ली : पुण्याजवळील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (ईएमसी) उभारले जाण्याची महत्वपूर्ण घोषणा आज केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

येथील सीजीओ कॉमप्लेक्स मधील सीइजी सभागृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत श्री चंद्रशेखर यांनी रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारले जाईल तसेच सीडॅक च्यावतीने इलेक्ट्रॉनिक्स डिझाईनिंग प्रकल्पही महाराष्ट्रात येणार असल्याची महत्वाची घोषणा केली.

रांजणगाव (फेस III) येथील होऊ घातलेल्या इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (ईएमसी) मुळे येत्या काळात जवळपास 5 हजार रोजगार उपलब्ध होणार असल्याचे श्री चंद्रशेखर म्हणाले. या प्रकल्पासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष पाठपुरावा केले असल्याचे श्री चंद्रशेखर यांनी यावेळी सांगितले.

ईएमसीच्या प्रकल्प विकासासाठी एकूण 492.85 कोटी रूपये अंदाजित खर्च येणार असून 207.98 कोटी रूपयें केंद्र सरकार तर 284.87 कोटी रूपये महाराष्ट्र शासनच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाव्दारे गुंतव‍िले जातील. या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे 2 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक भविष्यात आकर्षीत केली जाणार असल्याचेही श्री चंद्रशेखर यांनी सांगितले.

Delhi | Today we have approved the Electronics Manufacturing Cluster (EMC) proposal in Ranjangaon, Pune. I hope this is the beginning of the expanison of the electronic ecosystem in Maharashtra: Union MoS Electronics & IT Rajeev Chandrasekhar pic.twitter.com/6kwcPZbK45

— ANI (@ANI) October 31, 2022

या प्रकल्पातंर्गत अँकर क्लायंट मेसर्स आयएफबी रेफ्रिजरेशन मर्यादित ने या ठिकाणी 40 हजार एकर जमीन घेतली असून या कपंनी ने सुमारे 450 कोटी रूपयांची गुंतवणूक केलेली आहे. यासह 297.11 एकर जमीनीपैकी 200 एकर जमीन विविध इलेक्ट्रॉनिक औद्योगिक समुहांना वाटप केली जाईल, याठिकाणी इलेक्ट्रॉनिक उत्पादन आणि त्याशी निगडीत साखळी विकसित केली जाईल. पुढील 32 महिन्यांमध्ये येथील पायाभूत सुविधा पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल, अशी अपेक्षा श्री चंद्रशेखर यांनी यावेळी व्यक्त केली.

तामिळनाडू, कर्नाटक, नोएडा, तिरूपती या चार ठिकाणी ईएमसी प्रकल्प आहेत. आता महाराष्ट्रातही असा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याने आता रांजणगाव हा परिसर इलेक्ट्रॉनिक हब म्हणून ओळखले जाईल, असा आशावाद श्री चंद्रशेखर यांनी व्यक्त केली.

सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग, इंडिया (सी डॅक) ही संस्था पुण्यात आहे. या संस्थेच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स डिझाईनिंग चा एक प्रकल्पही महाराष्ट्रात होणार असल्याची माहिती श्री चंद्रशेखर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकल्पाची किंमत साधारण 1 हजार कोटी रूपये असणार असल्याचे श्री चंद्रशेखर यांनी सांगितले. पुढील काळात केंद्रीय माहिती तंत्रज्ञान विभागाच्यावतीने याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी रोड शो चे आयोजन केले जाणार असल्याचेही श्री चंद्रशेखर यांनी यावेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.