पिंपरी : इंदोरी येथील तरुणाच्या खुनातील 4 आरोपींना तळेगाव दाभाडे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर, 5 हून अधिक आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे. अशी माहिती पिंपरी-चिंचवड पोलीस उप आयुक्त (परिमंडळ 2) आनंद भोईटे यांनी दिली.
याबाबत अनिल मांडेकर यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. रविवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी रात्री 9.30 ते 10.30 च्या दरम्यान प्रणव उर्फ जय मांडेकर (19, रा. इंदोरी, तालुका मावळ) या तरुणाचा खून करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी कुणाल ठाकूर, ढुंगण बाळ्या उर्फ रोहन सुरते, विकी पवार, मंगेश हिरे, निलेश घायके, सागर गाडे यांच्यासोबत आणखी चार अल्पवयीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, की मयत प्रणव मांडेकर हा त्याच्या मित्रांसोबत तळेगाव दाभाडे येथील ईदगाह मैदानात गप्पा मारत बसला होता. त्याचा मित्र विशाल वर्मा व आरोपी मंगेश हिरे यांच्यात फोनवर भांडण झाले. त्यामुळे आरोपी कुणाल ठाकूर, ढुंगण बाळ्या उर्फ रोहन सुरते, विकी पवार, मंगेश हिरे, निलेश घायके, सागर गाडे, व इतर अल्पवयीन आरोपी मयत व त्याचे मित्र बसलेल्या ठिकाणी 6 ते 7 दुचाकीवरून आले. त्यांनी प्रणव व त्याच्या मित्रांवर दहशत निर्माण करुन त्यांना मारण्यासाठी आणलेले कोयते, लोखंडी रॉड काढले.
त्यामुळे प्रणव व त्याच्या मित्रांनी जीव वाचवण्यासाठी तेथून पळ काढला. आरोपींनी त्यांचा पाठलाग सुरु केला. त्यावेळी प्रणव व त्याचा मित्र कौस्तुभ खाडे हे तुकारामनगरकडे पळत असताना प्रणवला ऋग्वेद हॉस्पिटल येथे ठेच लागली आणि तो खाली पडला. त्यामुळे तो आरोपींच्या जाळ्यात अडकला. आणि आरोपींनी त्याला हेरून कोयता, लोखंडी रॉड यासारख्या धारदार हत्यारांनी त्याच्या डोक्यावर वार करून तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्याचा खून केला. हा सर्व प्रकार प्रणवचा मित्र कौस्तुभ खाडे यांनी पळताना मागे वळून पाहिला.
प्रणव मांडेकर याचा खून केल्यानंतर रात्री अकरा वाजताच्या सुमारास वरील गुन्ह्यातील अल्पवयीन आरोपीने ध्रुव खिल्लारे याच्यावर देखील कोयत्याने वार केले. परंतु, त्याने वेळेस पळ काढल्याने तो बचवला. याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ध्रुव खिल्लारे याने फिर्याद दिली आहे. ध्रुव यांचा मित्र मौसम शाहू आरोपीच्या मैत्रिणीसोबत फोनवर बोलत असल्याच्या रागातून हा खुनी हल्ला केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2, आनंद भोईटे, डॉ. काकासाहेब डोळे, पोलीस आयुक्त देहूरोड विभाग पुणे शाखा पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळेगाव दाभाडे गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंडणी विरोधी पथक अजय जोगदंड, पोलीस निरीक्षक गुन्हे नितीन लांडगे, सहाय्य्क पोलीस निरीक्षक अमरीश देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गानाथ साळी, पोलीस उपनिरीक्षक संदेश इंगळे, शरद शिपने, मारुती मदेवाड राहुल कोळी व इतरांनी केली आहे.