श्रीनगर : अल्पसंख्याक आणि इतर राज्यातील कामगारांना लक्ष्य करण्याचा कट सुरू ठेवत दहशतवाद्यांनी शनिवारी दक्षिण काश्मीरमधील बिजबेहारामध्ये उत्तर प्रदेशातील दोन कामगारांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
जखमींपैकी नथोनी प्रसाद याच्या पोटात आणि भीमाच्या कमरेला गोळी लागलीय. दोघंही उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. गेल्या 10 दिवसांत दक्षिण काश्मीरमधील अन्य राज्यातील कामगारांवर झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे.
यापूर्वी 3 नोव्हेंबर रोजी अनंतनागमधील एका खासगी शाळेजवळ बिहार आणि नेपाळमधील दोन मजुरांवर दहशतवाद्यांनी हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केलं होतं. अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहाराजवळील मोमीन भागात शनिवारी रात्री दहशतवाद्यांनी जवळून दोन कामगारांवर गोळीबार केला. या हल्ल्यात दोन्ही कामगार जखमी होऊन जमिनीवर पडले. ते मेले असं समजून दहशतवाद्यांनी तेथून पळून काढला. दोन्ही जखमी कामगारांना त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीनं अनंतनाग येथील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचारासाठी नेलं. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. इक्बाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही कामगारांची प्रकृती सध्या स्थिर आहे.