पोलीस आयुक्तांनीच केली शहरातील अवैध धंद्याची ‘पोलखोल’

लॉटरी सेंटर, व्हिडीओ गेम पार्लर मध्ये जाऊन स्वतः केली पाहणी; गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध धंद्यावर स्वतः पोलीस आयुक्तांनी जाऊन पाहणी केली आणि कारवाई करण्यास सांगितले. यामुळे गुन्हे शाखेचे आणि स्थानिक पोलिसांची एकच धांदल उडाली. शहरात देहूरोड, निगडी आणि वाकड या तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापे टाकून 33 आरोपींना अटक करुन 8 लाख 67 हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सुरु अवैध धंद्यांना ‘थारा’ दिला जाणार नाही, असे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पदभार स्वीकारताच स्पष्ट केले होते. यातूनच अनेक अधिकारी, कर्मचारी यांच्यावर उलबांगडीची कारवाई केलेली आहे. तसेच वारंवार सर्वांना विनंती वजा आदेश दिले आहेत. तरीही शहरात अवैध धंदे सुरु असल्याचे आयुक्तांना माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीची गोफणीयता ठेवत स्वतः पोलीस आयुक्त अंकुश शिंदे हे त्या ठिकाणी गेले. सर्व खातरजमा केली आणि त्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. बेकायदेशीर पणे सुरु असलेले व्हिडीओ पार्लर, लॉटरी सेंटर, जुगार, वेश्या व्यवसाय यावर कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेने देहूरोड, निगडी आणि वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई केली. पोलिसांनी 26 व्हिडीओ गेम मशीन, 7 एलईडी टीव्ही, रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.

स्वतःच गेले व्हिडीओ गेम पार्लर आणि लॉटरी सेंटर मध्ये …

शहरातील अवैध धंद्याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे हे साध्या वेशात आणि खासगी वाहनाने व्हिडीओ गेम पार्लर मध्ये गेले. त्या ठिकाणी त्यांनी सर्व प्रकार पाहिला. त्यानंतर लॉटरी सेंटर मध्ये गेले त्या ठिकाणी सुरु असलेला लॉटरी तिकिटा च्या नावाखाली सुरु असलेला जुगारही पाहिल्याची चर्चा आहे.

‘पुढील कारवाई पण मीच करु का ?’

पोलिस आयुक्तांनी स्वतः सर्व प्रकार पहिल्यानंतर त्यांनी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याला फोन करून याबाबत सांगितले. ‘आता इकडे येता की पुढील कारवाई पण मीच करु का?’ असे बोलत नाराजीचा सुरु व्यक्त केला. त्यानंतर मात्र चांगलीच पळापळ सुरु झाली.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केलेल्या कारवाई मुळे शहरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. सोबतच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. पोलीस आयुक्तांची पुढील मोहीम काय असणार याचीच चर्चा जोरात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.