पुणे : इंस्टाग्रामवरील ओळखीतून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून 40 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. संशयित आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. हा प्रकार मे 2021 ते 10 नोव्हेंबर 2022 या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडला.
राकेश कुमार हकिमसिंग चहर (रा. उंड्री) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात आयपीसी (IPC) 420, 406 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राकेश कुमार हकिमसिंग चहर याची मे 2021 मध्ये फिर्यादी तरुणीशी इंस्टाग्रामवर ओळख झाली. यानंतर त्यांच्या ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि प्रेमात झाले. त्यानंतर आरोपीने आपण श्रीमंत असल्याचे तरुणीला भासवले. तसेच राकेशकुमार याने त्याचे लग्न झालेले असताना देखील फिर्यादी पासून ही माहिती लपवून ठेवली. त्याने फिर्यादी तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले आणि वेळोवेळी तिच्याकडून रोख स्वरूपात आणि बँक ट्रान्सफर द्वारे पैसे उकळले. तसेच राकेशकुमारने फिर्यादी यांना त्यांच्या नावावर बँकेतून कर्ज घेण्यास भाग पाडले. घेतलेले 40 लाख 67 हजार रुपये कर्जाची रक्कम देखील आरोपीने लांबवली.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे सुनील तांबे करत आहेत.