पिंपरी : सोन्याचे बनावट कॉइन देऊन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या तळेगाव येथील एकाचा पनवेलजवळ मोटारीत गोळी घालून खून करण्यात आला. हा प्रकार दोन दिवसांनी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्ती गुन्हेगारी विश्वाशी संबंधित असल्याने प्रतिस्पर्धी टोळीकडून त्याचा खून करण्यात आला असावा, असा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
संजय कार्ले असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्या छातीत बंदुकीची गोळी मारल्याची खूण आढळून आली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलजवळ तारा गावाच्या हद्दीत शुक्रवारी ऑडी (एमएच.14 जीए.9585) कारमध्ये पुरुषाचा मृतदेह आढळून आला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या फार्म हाऊसजवळ मागील दोन दिवसांपासून गाडीत मृतदेह असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्यास मिळाली. तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
संबंधित ऑडी गाडी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले. लॉक असल्याने गाडीतील मृतदेह बाहेर काढण्यास पोलिसांना अडचणी निर्माण झाल्या होत्या, मात्र तज्ज्ञांच्या मदतीने गाडीचे दार उघडण्यात यश आले. मोटारीत एका पुरुषाचा मृतदेह आढळला. त्याच्या छातीवर बंदुकीच्या गोळीचे निशााण आढळून आल्याने हा खुनाचा प्रकार असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
ऑडी कारमध्ये मृतदेह आढळल्याची बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली. त्यामुळे त्या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
तालुका पोलीस संजय कार्ले याच्याविषयी बारकाई माहिती गोळा करीत आहेत, मात्र तपासाच्या दृष्टीने अद्यापि कोणताही महत्त्वाचा धागादोरा मिळाला नसल्याचे समजते.
संजय कारले हा तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्याच्याविरुद्ध भादवि कलम 420 354 506 व मोका अन्वय गुन्हा दाखल असून तो सहा महिन्यांपूर्वी वैद्यकीय रजेवर मुक्त झाला होता. या गुन्ह्यात त्याच्या सोबत प्रकाश उर्फ पिंट्या गोपाळ साळवे, महिंद्र गोपाळ साळवे, आकाश प्रकाश साळवे, तेजस प्रकाश साळवे, सिद्धार्थ महेंद्र साळवे, मीनाक्षी प्रकाश साळवे असे आरोपी होते, तेही जामीनवर मुक्त आहेत. संजय रमेश कारले हा सोन्याचे बनावट कॅाईन देवून लोकांची फसवणूक करत होता.