पुणे : पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघाताची घटना रविवारी रात्री उशीरा घडली आहे. या अपघातात 48 गाड्यांचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. कंटेनर ने धडक दिल्याने गाड्या एकमेकांवर आदळल्या असल्याचा अंदाज आहे. यामध्ये 50 ते 60 जण जखमी झाल्याची माहिती आहे.
या अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून घटनास्थळी धाव घेत काही नागरिकांच्या मदतीनं अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरु करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार नवले ब्रिजवर नर्हे नजीकच्या परिसरात हा भीषण अपघात झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लागलीच सिंहगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कंटेनरने धडक दिल्यामुळे या सर्व गाड्या एकमेकांवर आदळल्या असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात 30 गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. दरम्यान या अपघातात अद्याप तरी कुठलीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती आहे. या अपघातात अनेक जण जखमी झाले असून जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना, सुजित पाटील, अग्निशमन अधिकारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ( पीएमआरडीए) यांनी सांगितले की, आज रात्री 8:40 वाजताच्या सुमारास साताऱ्याहून पुण्याकडे येणाऱ्या टँकरने 48 चार चाकी वाहनांना धडक दिल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. हा अपघात आय लव्ह नऱ्हे सेल्फी पॉईंट जवळ झाला आहे. त्यामुळे साताऱ्या कडून पुण्याला येणारी या ठिकाणी बंद आहे.
पाटील म्हणाले की ,अग्निशमन कर्मचारी व पोलिसांनी मिळेल त्या वाहनाने जखमी लोकांना नजीकच्या नोबेल, पाटील व इतर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. रस्त्यावर ऑइल, डिझल सांडले असून ते अग्निशमन कर्मचारी साफ करीत आहेत.
या अपघातात 5 जण गांभीर जखमी झाल्याची माहिती शैलेश संखे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंहगड रोड पोलीस यांनी दिली.
प्रवीण जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक, नऱ्हे पोलीस चौकी म्हणाले की, रस्त्यावर ऑइल सांडले आहे. वाळूचा एक ट्रक मागविण्यात आला आहे. ऑइलवर वाळू टाकून रस्त्यावरील ऑइल साफ करण्यात येईल. वाहने भूमकर चौकातून डायवर्ट (वळवण्यात) आली होती.