प्राधिकरणाचे आरक्षित प्लॉट मिळवून देतो सांगून तब्बल 3 कोटींची फसवणूक

शहरातील नामांकित मयत व्यवसायिक, महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा

0

पिंपरी : नवनगर विकास प्राधिकरण मधील निगडी प्राधिकरण येथे प्लॉट देण्याच्या बहाण्याने तिघांनी एका तरुण व्यवसायिकाची दोन कोटी 76 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली. तसेच पैश्यांची मागणी केली असता खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची व्यवसायिकालाच धमकी दिली. हा प्रकार नोव्हेंबर 2017 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत पुणे आणि निगडी, प्राधिकरण येथे घडला.

सोनीत सोमनाथ परदेशी (38, रा. प्राधिकरण निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयत नरेंद्र रामचंद्र शेंगर (रा. प्राधिकरण निगडी), धर्मा सोनू गोल्हार (38, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) आणि एक महिला  (रा. अनिकेत सोसायटी, बापट चौक, बिबवेवाडी, पुणे) या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मयत नरेंद्र याने परदेशी यांना नवनगर विकास प्राधिकरण येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांची माझी ओळख असल्याचे सांगितले. परदेशी हे बांधकाम क्षेत्रांत काम करत असल्याने निगडी, प्राधिकरण येथे स्वस्तात प्लॉट मिळवून देतो असे सांगितले. यासाठी पैश्यांची तयारी ठेवा असे सांगितले.

प्राधिकरण परिसरात सहा हजार चौरस फुटांचे दोन प्लॉट देतो, असे परदेशी यांना भासवले. धर्मा गोलार प्राधिकरण अधिकाऱ्यांचा माणूस असून त्याच्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले. धर्मा याच्या खात्यावर पैसे जमा होताच दुसऱ्या दिवशी या खात्यावरून पूर्ण पैसे काढून घेण्यात आले. 

प्लॉट बाबत वारंवार विचारणा केली असता कारणे देण्यात आली. कोरोनाच्या महामारीत शेंगर यांचा मृत्यू झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच परदेशी यांनी पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना 13 लाख 50 हजार रुपये परत केले. उर्वरित दोन कोटी 76 लाख 50 हजार रुपये अद्याप परत केले नाहीत.

परदेशी यांनी पैसे परत मागितले असता, पैसे मागितल्यास आम्ही पोलीस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल करू, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. तपास निगडी पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.