तत्कालीन तहसीलदार, महसूल सहाय्यक, तलाठी व 2 खाजगी इसमांवर 42 लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी कारवाई

0

पुणे : शिरूर येथील तत्कालीन तहसीलदार, महसूल सहाय्यक, तलाठी व 2 खाजगी इसमांवर 42 लाख रुपयांची लाच मागण्याच्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी कारवाई केली आहे.

याबाबत एका 46 वर्षीय पुरुषाने तक्रार दिली होती. रंजना उमरहांडे, तत्कालीन तहसीलदार, शिरूर (वर्ग -1), स्वाती शिंदे, महसूल सहाय्यक, तहसीलदार कार्यालय शिरूर, सरफराज देशमुख, तलाठी मौजे शिरूर व खाजगी इसम अतुल घाडगे आणि निंबाळकर या आरोपींच्या विरोधात लाच मागणीचा गुन्हा बंड गार्डन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7, 7अ व 12 अन्वये दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांच्या ट्रस्टच्या जागेचे/ प्लॉटचे एन.ए ( अकृषक प्रमाणपत्र ) प्रस्ताव मंजूर करण्यासाठी व वरिष्ठ कार्यालयातून मंजुरी आणण्यासाठी तलाठी देशमुख यांनी त्यांच्यासाठी व त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी 40 लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. अशी तक्रार तक्रारदार पुरुषाने लाचलुचपत पुणे विभागाकडे केली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता तक्रारदार यांच्या ट्रस्टच्या जागेचे / प्लॉटचे एन.ए ( अकृषक प्रमाणपत्र ) मंजूर करण्यासाठी व वरिष्ठ कार्यालयातून मंजुरी आणण्यासाठी तलाठी देशमुख यांनी 42 लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. (Pune News) या कामांमध्ये मदत करण्यासाठी स्वाती शिंदे यांनी एक लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. तसेच जागेचा प्रस्ताव पुढे पाठविण्यासाठी व जिल्हाधिकारी कार्यालयात मदत करण्यासाठी तत्कालीन तहसीलदार रंजना उमरहांडे यांनी पाच लाख रुपयांची लाच मागीतली होती.

खाजगी इसम घाडगे व निंबाळकर यांनी या प्रस्तावाची जिल्हाधिकारी कार्यालयातून मंजुरी मिळवून देण्यासाठी व मदत करण्यासाठी 20 लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. तसेच यातील सर्व आरोपींनी लाच मागणीस  सहाय्य करून प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे या पाच आरोपींच्या विरोधात लाच मागणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी तलाठी देशमुख यांना गुन्ह्याच्या  तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

ला.प्र. वि पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक विरनाथ माने पुढील तपास करीत आहेत. पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक अमोल तांबे, ला.प्र. वि पुणे परिक्षेत्र, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, ला.प्र. वि पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.