पुणे : बाईक टॅक्सीविरोधात पुण्यातील रिक्षाचालकांनी बेमुदत आंदोलन पुकारले होते. परंतु प्रशासनाच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र आता आंदोलक रिक्षाचालकांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे.
‘बघतोय रिक्षावाला’ या संघटनेसह अनेक संघटना रिक्षा बंदच्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या. काल संघटनांनी हे आंदोलन मागे घेतले. ‘बघतोय रिक्षावाला’संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांनी बेकायदेशीरपणे टॅक्सी चालवणा-यांवर कारवाईसाठी समिती नेमण्यात येणार असल्याचे सांगितले. आंदोलन करणा-या रिक्षाचालकांसमोर तशी याबद्दल घोषणा केली. यानंतर हे आंदोलन मागे घेतले गेले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानंतर येत्या १० दिवसांत पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्यात येईल. या समितीत जिल्हाधिकारी यांच्यासह आरटीओचे अधिकारी तसेच ट्रॅफिक पोलिस विभागाचे अधिकारी असतील. या समितीकडून येत्या १० दिवसांत बेकायदा बाईक टॅक्सीवर कडक कारवाई केली जाणार आहे.
परंतु आता आंदोलनामध्ये सहभागी २ हजार ५०० रिक्षाचालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. विविध संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी, यामध्ये केशव क्षीरसागर, बाबा कांबळे, आनंद अंकुश यांच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहतुकीस अडथळा, नियमभंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. काल पुण्यामध्ये हजारो रिक्षाचालकांनी आरटीओ कार्यालयासमोर हे आंदोलन केले होते. कलम ३४१ नुसार अडीच हजार रिक्षाचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.