छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात; भाजप आमदाराचा शोध

0

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरूच आहे. आता भाजप आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असे वक्तव्य केले आहे.

यावर राष्ट्रवादी काँग्रेसने सडकून टीका करत भाजपने छत्रपतींचा चुकीचा इतिहास मांडण्याची व अपमानाची सुपारी घेतली आहे का?, असा सवाल केला आहे.

स्वराज्यभूमी कोकण महोत्सवाचे उद्घाटन करता आमदार प्रसाद लाड यांनी हे चुकीचे वक्तव्य केले. विशेष म्हणजे त्यांच्या बाजुलाच भाजप नेते प्रवीण दरेकर बसले होते. तेदेखील प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर काहीच बोलले नाहीत. प्रसाद लाड यांनी शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असे वक्तव्य केल्यानंतर समोर बसलेल्या काहींनी कुजबूज करत शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाला, असे लाड यांना सांगून पाहीले. मात्र, त्यानंतरही लाड यांनी आपल्या वक्तव्याबाबत खेद व्यक्त केला नाही की त्याची दुरुस्ती केली नाही.

उलट नंतर सारवासारव करताना शिवरायांचे बालपण कोकणात गेले. रायगडावर गेले. येथे त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली, असे अकलेचे तारे आमदार प्रसाद लाड यांनी तोडले. आश्चर्यजनक म्हणजे त्यांच्या बाजुला बसलेल्या प्रवीण दरेकरांसह एकाही भाजप नेत्याने, पदाधिकाऱ्याने यावर आक्षेप घेतला नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसाद लाड यांचा हा व्हिडिओ ट्विट करून भाजपवर सडकून टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर म्हटले आहे की, भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या. शिवाजी महाराज यांच्या नावे निवडणूक लढवतात. परंतु महाराजांचा इतिहासाच यांना माहीत नाही. त्यांच्या चुका उपस्थित पत्रकार सुधारत आहेत. ही खूप लाजिरवाणी बाब आहे.

प्रसाद लाड यांच्या या वक्तव्याने आता राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी म्हणाले की, भाजप आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवात आज नवीन इतिहास मांडला. “छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला व त्यांचे बालपण रायगडावर गेले” .परत एकदा इतिहासाशी छेडछाड झाली आहे. भाजपनी छत्रपतींचा चुकीचा इतिहास मांडण्याची व अपमानाची सुपारी घेतली आहे का?

Leave A Reply

Your email address will not be published.