पिंपरी : भोसरी पोलीस व अंमली पदार्थ विरोधी पथक यांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये पोलिसांनी 60 हजार रुपयांच्या गुटख्यासह तीन जणांना अटक केली आहे. ही करवाई शुक्रवारी (दि.2) व शनिवारी (दि.3) करण्यात आली आहे.
पहिल्या कारवाईमध्ये भोसरी पोलिसांनी शुक्रवारी भोसरीतील बाबुजी चौकातील एका टपरीवर कारवाई केली ज्यामध्ये पोलिसांनी इब्रान ताहिर अन्सारी (22, रा.भोसरी) याला अटक केली असून त्याच्याकडून पोलिसांनी 2 हजार 955 रुपयांचा गुटखा व तंबाखू जप्त केली आहे. बेकायदेशीररित्या विक्री करत असल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
दुसऱ्या कारवाईमध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी थेरगाव येथील डांगे चौक येथे एका हातगाडीवर व टाटा एस रंगाच्या गाडीमधील टपरीवर कारवाई केली.
याप्रकरणी पोलिसांनी हातगाडी चालक इरफान ताहीर तांबोळी (32, रा.काळेवाडी फाटा) व टपरी चालक सादिक गफुर तांबोळी (27, रा.वाकड) या दोघांना अटक केली असून त्यांना गुटखा व तंबाखूचा पुरवठा करणारे हुसेफा खान व प्रदिप गुप्ता हे फेरीवाले यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इरफान याच्याकडून पोलिसांनी मोबाईल व 54 हजार 981 रुपयांचा वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा व तंबाखू जप्त केली. त्याला हुसेफा हा आकुर्डी येथून माल आणून देत असल्याचे सांगितले. तर सादिक याला प्रदिप माल पुरवत असून सादिक याच्याकडून पोलिसांनी 2 हजार 933 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. असा एकूण 57 हजार 914 रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला असून दोघांवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत.