नवी दिल्ली : आजपासून संसदेच्याहिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.
सात डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत 23 दिवसांचे हे हिवाळी अधिवेशन असणार आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळी 10 वाजता प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान, या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे वादाचे पडसाद उमटणार असून शिवसेना ठाकरे गट या प्रश्नावर सभागृहात आवाज उठवणार आहे. तर दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्याची शक्यता आहे.
प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनं केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी केली आहे. काँग्रेस पक्षाचे खासदार विविध मुद्यावरुन आज सभागृहात आवाज उठवू शकतात. भारत-चीन सीमा विवाद, घटनात्मक संस्थांमध्ये सरकारचा हस्तक्षेप यासह महागाई, बेरोजगारी आणि जीएसटीबाबत काँग्रेसकडून सभागृहात मुद्दे उपस्थित केले जाऊ शकतात. त्याचबरोबर हमीभावाच्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना हमीभाव देण्याच्या मुद्द्यावरूनही काँग्रेस सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहे. भारत जोडो यात्रेमुळं काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी, खासदार जयराम रमेश आणि खासदार दिग्विजय सिंह यांच्यासह अनेक नेते संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहू शकणार नाहीत.
नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात संसदेच अधिवेशन होणार होते. मात्र, गुजरात निवडणुकीमुळं हे अधिवेशन उशीरानं सुरु होत आहे. हे अधिवेशन डिसेंबरच्या शेवटपर्यंत म्हणजे 29 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. गुजरात विधानसभेसाठी 1 आणि 5 डिसेंबरला मतदान झाले होते. याची 8 डिसेंबरला म्हणजे उद्या मतमोजणी होणार आहे. तसेच हिमाचल प्रदेश निवडणुकीची मतमोजणी देखील उद्याच होणार आहे. दरम्यान हे अधिवेशन 23 दिवसांचे असणार आहे. यामध्ये 17 बैठका होणार आहेत.
या हिवाळी अधिवेशनात 16 विधेयके सादर केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामध्ये डेंटल कमिशन विधेयक, राष्ट्रीय नर्सिंग आणि मिडवायफरी कमिशन विधेयक, मल्टिस्टेट सहकारी संस्था सुधारणा विधेयक, जुने अनुदान लिनियमन विधेयक, वन संरक्षण संशोधन विधेयक याचा समावेश आहे. संसदेच्या गेल्या अधिवेशनामध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हिवाळी अधिवेशन नव्या इमारतीमध्ये होईल, असा दावा केला होता. मात्र, नव्या इमारतीचे बांधकाम पूर्ण न झाल्याने हे हिवाळी अधिवेशन जुन्याच इमारतीमध्ये होणार आहे.