मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने पिंपरी-चिंचवडकरांना मोठे गिफ्ट दिले आहे. पिंपरी चिंचवड शहरात नवीन विद्यापीठ सुरू करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज हिरवा कंदील दाखवण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यात पुणे जिल्ह्याशी संबंधित दोन महत्त्वपूर्ण निर्णय यांचा समावेश आहे.
पिंपरी- चिंचवड विद्यापीठाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून त्यावर लवकरच काम सुरू केले जाणार आहे. विद्यापीठासाठी शहरात मोठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन शहरासाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे, अशी मागणी जोर धरू लागली होती. यापूर्वी पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू करण्याबाबत हालचाली सुरू होत्या. स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाच्या निर्मितीनंतर आता पिंपरी-चिंचवड शहरात स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करण्याचा निर्णय घेऊन शासनाने पिंपरी-चिंचवडकरांना सुखद धक्का दिला आहे.