महापुरुषांचा अवमान : मविआचा महामोर्चा, कार्यकर्ते मुंबईत दाखल

0

मुंबई : महापुरुषांबाबत अवमानजनक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व इतर भाजप नेत्यांविरोधात आज मुंबईत महाविकास आघाडी महामोर्चा काढणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमानजनक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची पदावरून तातडीने हकालपट्टी करावी, अशी प्रमुख मागणी महाविकास आघाडीने केली आहे. तसेच, महापुरुषांबाबत अवमानजनक वक्तव्य करणाऱ्या भाजप नेते व प्रवक्त्यांवरही कारवाई करावी, सीमाभागात मराठी भाषिकांची कर्नाटक सरकारकडून होणारी गळचेपी थांबवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ठोस भूमिका घ्यावी, या मागण्यांसाठी मविआतर्फे हा महामोर्चा काढला जात आहे.

आज सकाळी नागपाडा येथील रिचर्डसन अँड कृडास येथून मोर्चाला सुरूवात होणार आहे. महाविकास आघाडातील सर्व प्रमुख नेते या मोर्चात सहभागी होणार आहेत. महामोर्चासाठी राज्यभरातून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत. मोर्चात 1 लाख लोक सहभागी होतील, असा महाविकास आघाडीचा दावा आहे. भायखळा ते सीएसएमटी असे 5.30 किलोमीटर अंतर मोर्चेकरी चालणार आहेत. सरकारने 14 अटींसह मोर्चाला परवानगी दिली.

महाविकास आघाडीच्या मोर्चामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत आज सांयकाळपर्यंत बदल करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी या बदलाविषयी माहिती दिली आहे. त्यानुसार रिचर्डसन्स क्रूडास मिल, सर जे.जे. उड्डाणपूल, डॉ. दादाभाई नवरोजी रोड, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-टाईम्स ऑफ इंडिया हे मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. या मार्गांऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

समाजवादी पक्ष, सीपीआय, सीपीएम, लाल निशाण पक्ष, शेकाप, मराठा क्रांती ठोक मोर्चा, रिपाइंचा निकाळजे गट अशा 25 पक्ष-संघटनांनी महामोर्चाला पाठिंबा दिल्याचा दावा महाविकास आघाडीने केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.