पिंपरी : शाईफेक प्रकरणानंतर मंत्री चंद्रकांत पाटील हे चांगलेच सतर्क झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आपल्यावर परत शाईफेक झाल्यास डोळ्यास इजा होऊ नये, याची खबरदारी पाटील यांनी घेतली आहे. चंद्रकांत पाटील पिंपरीत एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळेस त्यांनी लावलेल्या फेसशिल्डने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. पाटलांनी चक्क फेसशिल्ड लावलं होतं.
आपल्यावर पुन्हा शाईफेक झाल्यास कोणतीही गंभीर इजा होऊ नये, यासाठी पाटलांनी ही खबरदारी घेतली आहे. कोरोना काळात भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही अशाच प्रकारचा फेसशिल्डचा वापर केला होता. दरम्यान पाटलांचा फेसशिल्ड हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
“सरकारवर अवलंबून का राहताय? कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी या देशात शाळा सुरु केल्या. या सर्वांना शाळा सुरु करताना सरकारने अनुदान नाही दिलं. यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा सुरु करायचीय आम्हाला पैसे द्या. तेव्हा 10 रुपये देणारे होते. 10 कोटी देणार लोक आहेत ना”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ते औरंगाबादेत मराठवाडा विद्यापिठाच्या संतपीठाच्या पहिल्या तुकडीच्या प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रमात म्हणाले होते. या विधानानंतर या वादाला तोंड फुटलं होतं.