मुंबई : ज्या करदात्यांनी 31 जुलै 2022 पर्यंत काही कारणास्तव आयटीआर ITR दाखल केलेला नाही, त्यांना आता सरकारकडून आणखी एक संधी मिळाली आहे. अशा करदात्यांनी 31 डिसेंबर 2022 पर्यंत आयटीआर भरता येईल.
मात्र, यासाठी त्यांना 5000 रुपये लेट फी भरावी लागणार आहे. मात्र जर करदात्यांनी यावेळीही आयटीआर भरला नाही तर पुढील वर्षी त्यांना 10,000 रुपये भरावे लागतील. मात्र इथे हे लक्षात ठेवा की, यामध्ये त्या लोकांचा समावेश नाही ज्यांच्या ITR चे ऑडिट आवश्यक आहे. त्याप्रमाणे ज्यांचे एकूण उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त नाही अशा लोकांनाही यामध्ये थोडा दिलासा देण्यात आला आहे.
आरएसएम इंडियाचे संस्थापक असलेले डॉ. सुरेश सुराणा म्हणतात की,” ज्यांचे एकूण उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त नाही, त्यांना लेट फी म्हणून फक्त 1000 रुपयेच भरावे लागतील. ITR उशीरा भरल्यास फक्त लेट फीच नाही तर या टॅक्सवर व्याजही भरावे लागते. मात्र हे व्याज मासिक आधारावर आकारले जाईल. आयटी कायद्यानुसार, करदात्यांकडून टॅक्सच्या रकमेवर 1% पर्यंत व्याज आकारले जाऊ शकेल.
सुरेश सुराणा यांनी स्पष्ट केले की,” जर करदात्याने वेळेत ITR दाखल केला नाही तर, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला करदात्याकडून नोंद न केलेल्या उत्पन्नाच्या 50% इतका दंड आकारण्याचा अधिकार आहे. जर डिपार्टमेंटला वाटत असेल की, हा आयटीआर हेतुपुरस्सर दाखल केला गेला नाही तर डिफॉल्टरला 6 महिने ते 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास देखील होऊ शकेल. हे जाणून घ्या कि, करचुकवेगिरीची रक्कम 25 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर 3 महिने ते 2 वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.