पिंपरी : पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या तक्रारी अर्जावरून आरोपी न करण्यासाठी तसेच सदरील अर्ज दिवाणी बाब म्हणून फाईल करण्यासाठी 3 लाख रूपयाची मागणी करुन 2 लाखात ‘सेटल’ केल्याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकावर पुणे अॅन्टी करप्शन विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस उपनिरीक्षक रोहित गणेश डोळस असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पीएसआयचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी पोलिस ठाण्यात एक तक्रारी अर्ज दाखल आहे. त्या अर्जावरून अॅन्टी करप्शनकडे तक्रार देणार्याच्या मावस भावास आरोपी न करण्यासाठी तसेच पिंपरी पोलिस ठाण्यात प्राप्त झालेला अर्ज हा दिवाणी बाब म्हणून फाईल करण्यासाठी सुरूवातीला पोलिस उपनिरीक्षक डोळस यांनी 3 लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 2 लाख रूपयांची मागणी केली.
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पोलिस उपनिरीक्षक रोहित डोळस यांच्याविरूध्द तक्रार दिली. प्राप्त झालेल्या तक्रारीची दि. 2 डिसेंबर 2022 रोजी पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये पीएसआय रोहित गणेश डोळस हे लाचेची मागणी करीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आज (दि. 30 डिसेंबर) अॅन्टी करप्शनकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भारत साळुंखे, संदीप वर्हाडे, पोलिस हवालदार मुकुंद अयाचीत, पोलिस कर्मचारी भूषण ठाकूर आणि चालक एएसआय जाधव यांनी पडताळणी करून गुन्हा दाखल केला आहे.