मुंबई : छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हेत, तर स्वराज्यरक्षकच आहेत, असे वक्तव्य विधानसभेत केल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर अखेर भूमिका स्पष्ट करत अजित पवार यांनी पडदा टाकला. एकीकडे आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत म्हणतानाच, दुसरीकडे शरद पवारांच्या भूमिकेशीही सहमत असल्याचे सांगत भाजपला शांत करण्याचा प्रयत्न केला.
छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हेत, तर स्वराज्यरक्षकच आहेत, असे वक्तव्य विधानसभेत केल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर अखेर भूमिका स्पष्ट करत अजित पवार यांनी पडदा टाकला. एकीकडे आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत म्हणतानाच, दुसरीकडे शरद पवारांच्या भूमिकेशीही सहमत असल्याचे सांगत भाजपला शांत करण्याचा प्रयत्न केला.
अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच राज्यपालांसह भाजपच्या ज्या नेत्यांनी महापुरुषांविषयी बदनामीकारक विधाने केली, त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत छत्रपती संभाजी महाराज यांचा धर्मवीर नव्हे तर स्वराज्यरक्षक असा उल्लेख केला. त्यामुळे भाजपने आकाशपाताळ एक करत राज्यभर आंदोलन सुरू केले होते. दुसरीकडे त्यानंतर लगेचच युवराज संभाजीराजे भोसले यांनी अजित पवार यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे सांगितले. शिवाय छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर होते, असे म्हणाले. त्यामुळे भाजपच्या आंदोलनाला धार चढली होती. या साऱ्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
अजित पवारांनी यावेळी आपण शरद पवार यांच्या विधानाशाहीही सहमत असल्याचे सांगितले. अजित पवार यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर काल शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली होती. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्यरक्षकासोबतच धर्मवीर म्हणण्यात काहीही वावगे नसल्याचे सांगितले होते. या भूमिकेशीही अजित पवार यांनी आज सहमती दर्शवली.
दुसरीकडे धर्मवीर या पदवीविषयी बोलताना अजित पवार म्हणाले की, काही लोक संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणतात. मात्र, दुसरीकडे काही लोक स्वतःलाच धर्मवीर म्हणतात. काही लोकांवर तर चित्रपटही निघाले आहेत. त्याचा दुसरा पार्टही येणार आहे. जर संभाजी महाराज धर्मवीर असतील, तर दुसरे धर्मवीर होऊ शकणार नाहीत. त्यामुळे दुसऱ्या कुणाला स्वराज्य रक्षक म्हणता येणार नाही, असे माझं मत आहे, असेही अजित पवार म्हणाले.
मी खूप काही मोठी चूक केलेली नाही. मी माझी भूमिका मांडली. ज्याला योग्य वाटेल त्याने स्वीकारा. ज्याला योग्य वाटत नसेल त्यांनी सोडून द्यावे. त्यांना त्यांचा पक्ष वाढवायचा आहे, असेही पवार म्हणाले. महापुरुषांबद्दल भाजपच्या नेत्यांनी जी विधाने केली, त्यामुळे जे वातावरण महाराष्ट्रात निर्माण झाले, त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी ही टूम काढली आहे, अशी टीकाही अजित पवार यांनी यावेळी केली.