लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ संत तुकाराम महाराज मंदिर उभारणीसाठी १ कोटी ६० लाखांची मदत; दशक्रिया विधीला जनसागर लोटला

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या जाण्यामुळे शहराची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या नसण्यामुळे समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ते जगण्याच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे सात्विक व्यक्तिमत्त्व होते. स्वतःच्या मृत्यूची कल्पना असतानाही जनतेची सेवा करणारे लक्ष्मणभाऊ आम्ही अनुभवले, अशा भावना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गुरूवारी व्यक्त केल्या. यावेळी अनेकांचे अश्रू अनावर झाले होते.

भाजपचे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना अखेरचा निरोप देण्यासाठी दशक्रिया विधी पार पडला. त्यासाठी पिंपळेगुरवमध्ये हजारोंचा जनसागर लोटला होता. यावेळी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या वतीने भंडारा डोंगरावर उभारण्यात येणाऱ्या संत तुकाराम महाराज मंदिरासाठी १ कोटी ६० लाखांची मदत देण्यात आली.

आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे ३ जानेवारी रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. गेले नऊ दिवस त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी पिंपळेगुरव येथील निवासस्थानी राज्यभरातील सर्वपक्षीय नेते तसेच धार्मिक, अध्यात्मिक, कला, सांस्कृतिक, क्रीडा, उद्योग, सामाजिक, बांधकाम अशा सर्व क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेट दिली. लक्ष्मणभाऊ जगताप यांना आदरांजली वाहून कुटुंबियांचे सांत्वन केले. गुरूवारी सकाळी पिंपळेगुरव येथे पवना नदीकाठी दशक्रिया विधी पार पडला. धार्मिक विधी पार पडल्यानंतर पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे सहअध्यक्ष सद्‌गुरू श्री. गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे प्रवचन झाले. औसेकर महाराजांनी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या सामाजिक, राजकीय तसेच सात्विक आणि धार्मिक आचरणाचा विशेष उल्लेख करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

त्यानंतर आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या वतीने विराज रेणुसे, ऋषीराज सावंत, गिरीराज सावंत यांनी भंडारा डोंगरावर उभारण्यात येत असलेल्या संत तुकाराम महाराज मंदिरासाठी अध्यक्ष बाळासाहेब काशीद पाटील यांच्याकडे १ कोटी ६० लाखांचा धनादेश सुपूर्त केला.

या दशक्रिया विधीसाठी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत, खासदार श्रीरंग बारणे, आमदार व भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे, आमदार संजय जगताप, सुनील टिंगरे, माजी मंत्री बाळा भेगडे, माजी आमदार विलास लांडे, बाळासाहेब शिवरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विनोद बन्सल, दादा वेदक, हभप आचार्य रामकृष्णदास लहवितकर महाराज, हभप पंकज महाराज गावडे यांच्यासह शहरातील सर्वपक्षीय माजी नगरसेवक व नगरसेविका, सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आजी व माजी अधिकारी-कर्मचारी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सूत्रसंचालन शिक्षण मंडळाचे माजी सभापती नाना शिवले यांनी केले. दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे बंधू व भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, विजय जगताप यांनी उपस्थितांचे ऋणनिर्देश व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.