नवी दिल्ली : दोन दिवसांपासून म्हणजेच 11 जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या 22 वर्षीय महिला क्रिकेटरचा मृतदेह जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. राजश्री स्वेन असं मृत महिला क्रिकेटरचं नाव आहे. अथागढ भागातील गुरडिजाटिया जंगलात मृतदेह आढळला. या बातमीमुळे क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
राजश्रीच्या मृत्यूचं अद्याप कोणतीही कारण समोर आलं नाही. तिच्या प्रशिक्षकांनी गुरूवारी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. आज तिचा मृतदेह जंगलामध्ये आढळला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. राजश्रीच्या कुटुंबियांनी तिची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. राजश्रीच्या शरीरावर जखमा होत्या आणि तिच्या डोळ्याला सुज असल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे.
ओडिशा क्रिकेट असोसिएशनने बज्रकाबती भागात प्रशिक्षण शिबिरात आयोजित केलं होतं. पुद्दुचेरी येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट स्पर्धेसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये 25 महिला क्रिकेटपटू सहभागी झाल्या होत्या. या सर्व एका हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. ओडिशा राज्य महिला क्रिकेट संघाची 10 जानेवारी रोजी घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये राजश्रीचा समावेश नव्हता.
दरम्यान, राजश्रीजवळ एक सुसाईड नोट सापडल्याचीही माहिती समजत आहे. त्यामध्ये, ती चांगली खेळत होती तरीसुद्धा वारंवार दुर्लक्ष करून मानिसक छळ करण्यात आल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी राजश्रीच्या मृत्यूची अनैसर्गिक नोंद केली आहे. प्रशिक्षक आणि ओसीए व्यवस्थापनाची चौकशी होणार आहे.