पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरातील महानगरपालिकेच्या सर्वच रुग्णालयामध्ये असणाऱ्या विविध समस्यांबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त श्री. जितेंद्र वाघ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.
शहरातील पालिकेच्या सर्व रुग्णालयामध्ये अनेक समस्या नागरिकांना भेडसावत असून त्यासंदर्भात असणाऱ्या सर्व अडचणी आयुक्त श्री. वाघ यांच्यासमोर मांडून त्याबाबत सकारात्मक तोडगा काढण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
शहरातील वैद्यकीय रुग्णालयामध्ये सर्वात मोठे वाय सी एम रुग्णालय आहे. ७५० बेड च्या या रुग्णालयात रुग्णांकडे तात्काळ लक्ष दिले जात नाही. तसेच इतर चार मोठ्या रुग्णालयामध्ये सर्व सुविधा यामध्ये उपलब्ध बेड, आय सी यू बेड, ओ पी डी, एक्स रे, सिटी स्कॅन अशा सुविधांची माहिती ऑनलाईन मिळावी. त्याचबरोबर कोविडजन्य स्थितीमध्ये रुग्णालयातील सेवा मोफत दिली त्याचप्रमाणे स्थानिक नागरिक आणि केशरी शिधापत्रिका धारकांना मोफत आरोग्य सेवा मिळावी. थेरगाव रुग्णालयातील आय सी यू बेड आणि न्युरो सर्जन वाढविण्यात यावे. त्याचबरोबर ऑपरेशन थिएटर, व्हेंटिलेटर, वाढविण्यात यावे. सर्वच रुग्णालयामध्ये कुशल कर्मचारी वर्ग असायला हवा जेणेकरून नागरिकांना योग्यप्रकारे सुविधा मिळतील.
त्याचप्रमाणे सर्व मोठ्या रुग्णालयामध्ये आवश्यक सुरक्षा व्यवस्था देण्यात यावी. जेणेकरून अनावश्यक गोंधळ होणार नाही. जन्मजात मुलांना ठेवण्यासाठी काचेच्या पेट्या आवश्यक आहेत. सोनोग्राफी मशीन अद्ययावत हव्या आहेत. वैद्यकीय रुग्णालयातील आवश्यक साहित्यांची खरेदी करणे गरजेचे आहे. शहरातील समस्यांमध्ये आरोग्य व शिक्षण यांना प्राधान्य क्रम देण्यात यावा. म्हणजे उद्भवणाऱ्या समस्यांची योग्य प्रकारे सोडवणूक केली जाईल.
या व याप्रकारच्या सर्व समस्यांबाबत आयुक्तांची भेट घेतली. आयुक्तांनीही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. व त्याबाबत सकारात्मक तोडगा काढण्याबाबत ग्वाही दिली.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे विशाल वाकडकर (उपाध्यक्ष: राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश), विशाल काळभोर ( सरचिटणीस: राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश, पुणे प्रभारी), मयूर जाधव (सरचिटणीस: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश), प्रसाद कोलते, अक्षय माछरे , शेखर काटे, प्रतीक साळुंखे ,संकेत जगताप, विपुल तापकीर, तुषार ताम्हाणे, अजय तेलंग, विशाल पवार, मंगेश आसवले, श्रीनिवास बिरादार, ओंकार देशमुख, दर्शन गवारी, समीर शेख, आफ्रिद शिकलगार, यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.