मायक्रोसॉफ्टमध्ये आजपासून नोकरकपात; हजारो कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची भीती

0

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून ट्विटर, मेटा तसेच अन्य जगप्रसिद्ध कंपन्यांकडून कर्मचारीकपात केली जात आहे. असे असतानाच आता माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या मायक्रोसॉफ्ट या कंपनीकडूनही तब्बल ११ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाण्याची शक्यता आहे.

स्काय न्यूज आणि रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार मायक्रोसॉफ्ट या कंपनीमध्ये जवळपास ५ टक्के कर्मचारीकपात केली जाणार आहे. या कारवाईअंतर्गत एकूण ११ हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाण्याची शक्यात आहे. आजपासूनच त्याची सुरुवात होणार असून मुख्यत्वे मनुष्यबळ आणि इंजिनिअरिंग या विभागांत ही नोकरकपात केली जाऊ शकते.

मायक्रोसॉफ्ट कंपनीत जगभरात ३ लाख २१ हजार कर्मचारी पूर्णवेळ काम करतात. यामध्ये एकट्या अमेरिकेत १ लाख २२ हजार कर्मचारी आहेत. तर ९९ हजार कर्मचारी हे जगभरात विस्तारलेले आहेत. मागील काही दिवसांपासून पर्सनल कॉम्प्यूटर विक्री क्षेत्रात मंदी आहे. त्याचा फटका मायक्रोसॉफ्ट या कंपनीला बसलेला आहे. याच कारणामुळे मायक्रोसॉफ्टकडून हा निर्णय घेण्यात येतोय. मायक्रोसॉफ्टने मागील वर्षी जुलै महिन्यातच काही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते. Axios या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार कंपनीने मागील वर्षातील ऑक्टोबर महिन्यात जवळपास १००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते.

दरम्यान, मायक्रोसॉफ्टच्या या निर्णयामुळे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अस्वस्थता निर्माण झाली आहे. याआधी ट्विटर आणि फेसबूक या कंपन्यांनीदेखील बऱ्याच कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.