झवेरी बाजारात ‘स्पेशल 26’ची पुनरावृत्ती ; बनावट ईडी अधिकाऱ्यांनी छापा टाकून लुटले कोट्यावधीचे दागिने

0

मुंबई : स्पेशल 26 या चित्रपटात खोटे अधिकारी बनून जशी लूटमार करण्यात आली होती तशीच मुंबईतील ही घटना आहे. या चोरीची आता संपूर्ण मुंबईभर चर्चा सुरु आहे. फिल्मी स्टाईलने चोरट्यांनी तब्बल 25 लाखांची रोख रक्कम आणि 1 कोटी 70 लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याने पोलीस प्रशासन देखील हादरलं आहे. आता या प्रकरणातील आरोपींना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.

बनावट ईडी अधिकाऱ्यांनी मुंबईच्या झवेरी बाजार परिसरात छापे टाकून कोट्यवधी रुपयांच्या दागिन्यांची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

झवेरी बाजारातील एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर चार अज्ञात लोकांनी छापा टाकला आणि स्वतःला ईडीचे अधिकारी असल्याचे सांगितले. आरोपींनी तक्रारदार व्यावसायिकाच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्यालाही बेड्या घातल्याचं सूत्रांनी सांगितले. यानंतर आरोपींनी कार्यालयातून 25 लाख रुपये रोख आणि तीन किलो सोने चोरुन नेले.

बनावट ईडी अधिकाऱ्यांनी लुटलेल्या सोन्याची दागिन्यांची एकूण किंमत एक कोटी 70 लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चार अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि कलम 394, 506 (2) आणि 120 ब अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसंच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.

भारतीय मानक ब्युरोने (BIS) काल (23 जानेवारी) बनावट हॉलमार्क केलेले दीड कोटीहून अधिक रकमेचे सोन्याचे दागिने जप्त केले. नागपूर शहर, पुणे, मुंबई, ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी छापे टाकून ही मोठी कारवाई करण्यात आली. हे छापे एकाच वेळी टाकण्यात आले. मुंबईतील झवेरी बाजार परिसरात सोन्याच्या दागिन्यांवर बनावट हॉलमार्किंग करणाऱ्या दोन छोट्या संस्थांवर छापे टाकण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.