नवी दिल्ली : मध्यप्रदेशमध्ये भारतीय हवाई दलाच्या विमानांचा भीषण अपघात झाला आहे. भारतीय हवाई दलाचे सुखोई-३० आणि मिराज २००० ही विमानं कोसळली आहेत. या विमानांची हवेत धडक झाल्याचं सांगितलं जात आहे. अपघातात दोन वैमानिक जखमी झाले आहेत. तर, एकाचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय हवाई दलाने दिली आहे.
मध्यप्रदेशमधील मोरेना येथे शनिवारी सकाळच्या सुमारास सुखोई-३० आणि मिराज २००० हे दोन विमानं कोसळली. दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर येथील हवाई तळावरून उड्डाण केलं होतं. अपघातावेळी सुखोई-३० मध्ये २ वैमानिक आणि मिराज २००० मध्ये एक वैमानिक होता. यातील मिराजमधील वैमिनाकाचा मृत्यू झाला आहे. तर, सुखोई-३० मधील दोन्ही वैमानिक गंभीर जखमी आहेत.
दरम्यान, सुखोई-३० आणि मिराज २००० यांची हवेतच धडक झाल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत हवाई दलाकडून चौकशी करण्यात येणार असल्याचं समोर आलं आहे. तसेच, या अपघाताची संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सीडीएस अनिल चौहान यांनी हवाई दलाचे प्रमुख व्ही.आर. चौधरी यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे.