पिंपरी : म्हाळुंगे येथे वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या एका लॉजवर पोलिसांनी छापा मारला. त्यामध्ये सहा महिलांची सुटका करत पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 30) सायंकाळी कुरुळी येथे करण्यात आली.
गौतम गणपत वाघमारे (24, रा .भुसावळ, जळगाव), ऋषिकेश युवराज कदम (22, रा. भोसरी. मूळ रा. पाटोदा बीड), इसराइल अब्दुल्ला पठाण (24, रा. गांधीनगर, बेळगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह लॉज चालक दीपक जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरळी येथील शिवदीप लॉज मध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती म्हाळुंगे पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता लॉजमध्ये डमी गिऱ्हाईक पाठवले. लॉज मधील आरोपींनी पोलिसांनी पाठवलेल्या गिर्हाईकाकडून दीड हजार रुपये घेऊन त्यास एका रूममध्ये पाठविले.
त्यावेळी म्हाळुंगे पोलिसांनी लॉजवर छापा मारून तिघांना ताब्यात घेतले. या कारवाई मध्ये पोलिसांनी सहा महिलांची वेश्याव्यवसायातून सुटका केली. आरोपीने पीडित महिलांना पैशांचे आम्ही दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांचा लॉजवर छापा पडल्याचे माहिती होताच लॉज चालक दीपक जाधव याने लॉज मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे बॅकअप असलेला डीव्हीआर काढून घेतला. छाप्यात पोलिसांच्या हाती काही लागू नये यासाठी डीव्हीआर घेऊन दीपक पळून गेला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.