पिंपरी :चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय आठवले गट, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत क्रांती व प्रहार संघटना महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी शनिवारी (दि. ११) वाकड परिसरातील सोसायट्यांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी वाकड भागातील सोसायट्यांमधील प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे.
प्रचारादरम्यान नागरिकांसोबत संवाद साधताना महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप म्हणाल्या, “पिंपरी-चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाल्यानंतर लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मोठमोठी विकासकामे या परिसरामध्ये करण्यात आली. बहुतांश आरक्षणे ताब्यात घेऊन विकसित करण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांना उद्याने, विरंगुळा केंद्र, कम्युनिटी हॉल, चांगले रस्ते यांसारख्या सुविधा मिळाल्या. परिणामी या भागाचा विकास झाला आणि त्याचा नागरिकांपर्यंत फायदा पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.”
खेळाडू “भाऊं”साठी मैदानात
वाकड परिसरात गाठीभेटी घेत असताना अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी येथे भरविण्यात आलेल्या “वाकड प्रीमिअर लीगला” भेट दिली. यावेळी येथील खेळाडूंनी अश्विनी जगताप यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार केला. खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावेत यासाठी भाऊंकडून नेहमीच सढळ हातांनी मदत केली जात होती, ही आठवण ठेवून आम्ही ‘भाऊं’साठी निवडणुकीच्या ”मैदानात” तुमच्या बाजूनेच कौल देणार असल्याची ग्वाही या खेळाडूंनी दिली.