भाऊंनी मतदारसंघात केलेल्या विकासकामांमुळेच मतदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना विजयी करणार : चंद्रकांत पाटील
पिंपरी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेतले. पेट्रोल-डिझेलचा व्हॅट रद्द केला. सात लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त केले. सरकारी योजनेतून ३०० चौरस फुटाचे घर देण्याची घोषणा केली. दिलासा मिळतो तेव्हा कोणीही “मोदीजी जिंदाबादच” म्हणतो. चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनीही दूरदृष्टी ठेवून चिंचवड मतदारसंघात विकासकामे केली. त्यातून संपूर्ण शहरातील नागरिकांच्या जीवनमानात लक्षणीय बदल झाला. हा बदल जनतेला कळतो. भाऊंनी केलेल्या विकासकामांमुळेच ही जनता पोटनिवडणुकीत अश्विनी लक्ष्मण जगताप यांना विजयी करणार याची मला पूर्ण खात्री असल्याचे पालकमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (दि. १२) सांगितले.
चिंचवड पोटनिवडणुकीतील भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय आठवले गट, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत क्रांती व प्रहार संघटना महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचार कार्यालयाचे काळेवाडी, तापकीरनगर येथे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप, खासदार श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, माजी महापौर माई ढोरे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, आरपीआय आठवले गटाचे शहराध्यक्ष स्वप्नील कांबळे, रासपचे शहराध्यक्ष भरत महानवर, प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष विनोद गायकवाड, लोकजनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष संजय आल्हाट, हरेश तापकीर यांच्यासह भाजप व मित्रपक्षाचे माजी नगरसेवक, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, “देशात भाजपाची सत्ता आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणात विकास केला. अनेक सुविधा निर्माण केल्या. देशभर रस्त्यांचे जाळे विणले. दळणवळणाच्या सुविधा निर्माण झाल्याने देशाची प्रगती वेगाने होत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात पंतप्रधान मोदी यांनी सात लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करून सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. त्यांनी तीनशे चौरस फुटाचे घर सरकारी योजनेतून मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वच्छ अभियानामुळे घरापासून ते गावकुसापर्यंत शौचालये उभारली गेली. महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट रद्द केला. आमच्या सरकारने एसटीमध्ये ७५ वर्षांपुढील ज्येष्ठांना मोफत प्रवासाचा निर्णय घेतला. ठाकरे सरकारने बंद केलेली मुख्यमंत्री आरोग्य सहाय्य योजना सुधारित केली. या योजनेतून गरजू रुग्णांपर्यंत १०० कोटींहून अधिक रक्कम पोहोचली आहे. अशी अनेक लोकोपयोगी कामे भाजप आणि शिवसेना पक्षाने केली आहेत. त्यामुळे मतदार कामे करणाऱ्या सरकारच्या बाजूने उभे राहणार आहेत.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनीही चिंचवड मतदारसंघात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. त्यांनी दूरदृष्टी ठेवून मतदारसंघाचा कायापालट केला आहे. त्यामध्ये त्यांच्या कुटुंबाचेही योगदान आहे. या विकासकामांमुळेच येथील नागरिकांच्या जीवनमानात लक्षणीय बदल झालेला आहे. येथील जनता विकासकामाला प्राधान्य देणारी आहे. जनतेला लक्ष्मण जगताप यांनी केलेला विकास दिसतो आहे. त्यामुळेच ही जनता लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना विजयी करणार याची मला पूर्ण खात्री असल्याचे त्यांनी सांगितले.”