पुणे : पुण्यातील गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी देणारा एक फोन करण्यात आला होता. या फोन कॉलमुळे गुगलचे ऑफिस असणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरात एकच खळबळ उडाली होती. पुण्यात कोरेगाव पार्कमध्ये असलेल्या गुगल मध्ये बॉम्ब असल्याचा फोन करण्यात आला होता.
कोरेगाव पार्क येथील गुगल ऑफिसच्या बिल्डिंग मध्ये बॉम्ब ठेवल्याचा फेक फोन कॉल काल एका व्यक्तीने केला होता. मुंबईतील गुगल ऑफिसमध्ये पुण्याचे गुगल ऑफिस उडवून देऊ असा धामिकाचा निनावी कॉल करण्यात आला होता. बॉम्ब शोधक पथकाकडून काल रात्री संपूर्ण बिल्डिंगची तपासणी करण्यात आली होती.
संपूर्ण तपासामध्ये यावेळी कुठली ही वस्तू संशयास्पद आढळून आली नाही. पोलीस अधिकारी आणि बीडीडीएस पथकाकडून संपूर्ण इमारतीची पाहणी करण्यात आली आहे. ज्या व्यक्तीने धमकीचा फोन केला होता त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची प्रथामिक माहिती समोर आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
हा फोन कॉल केल्याप्रकरणी ४५ वर्षीय व्यक्तीला हैद्राबाद मधून ताब्यात घेतले आहे. हा व्यक्ती दारूच्या नशेत होता आणि अशात त्याने हा कॉल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या व्यक्तीचा भाऊ पुण्यात वास्तव्यास आहे आणि त्या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. याच गोष्टीचा राग मनात धरून या व्यक्तीने भावाला त्रास व्हावा म्हणून दारूच्या नशेत थेट गुगल चे ऑफिस उडवून देण्याची धमकी दिली होती.