मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावायाला जीवे मारण्यासंबंधी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या प्रकरणात आरोप करत जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी ठाणे महानगर पालिकेतील अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात नौपाडा पोलिसांनी भांदंवी कलम 353, 307, 332, 506(2), 143, 148, 149, 120 (ब), या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. नगरपालिका अधिनियम 3/25, 4/25 अन्वये एफआयआर नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे आता जितेंद्र आव्हाड यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना मारण्याबाबत एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ऑडिओ क्लिपमध्ये आव्हाडांच्या मुलीला आणि जावयाला मारण्याबाबतचा उल्लेख आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यानंतर आव्हाड यांच्या समर्थकांनी महेश आहेर या अधिकाऱ्याला मारहाण केली. या क्लिपबाबत जितेंद्र आव्हाड यांनी दुजोरा दिला होता. त्यांनी माध्यमांशीही यासंदर्भात संवाद साधला होता.
बुधवारी सायंकाळी 6 वाजून 45 मिनीटांनी जितेंद्र आव्हाड यांचे खासगी सचिव अभिजीत पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर यांच्यासह आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी ठाणे महानगर पालिकेच्या गेटवर हा हल्ला केला. ठाणे मनपामध्ये अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत असलेले महेश आहेर हे कामकाज संपल्यानंतर घरी निघाले होते. त्याच वेळी जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला.
या वेळी महेश आहेर यांच्यासोबत त्यांचे सुरक्षरक्षकही होते. पालिका मुख्यालय इमारतीच्या प्रवेशद्वारावर चार जणांनी येऊन त्यांना मारहाण केली. आहेर यांच्या बचावासाठी सुरक्षारक्षक धावले आणि त्यातील एकाने बंदुक बाहेर काढली. त्यानंतर महेश आहेर यांना सुरक्षा कडे करुन मुख्यालयात नेण्यात आले.
मनपाचे वरीष्ठ अधिकारी आणि नौपाडा पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिस संरक्षणामध्ये महेश आहेर यांना जिल्हा शासकी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन नौपाडा पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा यांनी नौपाडा पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. व्हायरल होणाऱ्या या ऑडिओमध्ये त्यांना जीवे मारण्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
व्हायरल झालेल्या ऑडिओमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावयाला जीवे मारण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. आव्हाड यांची मुलगी नताशा आणि जावई यांचा स्पेनमधील पत्ता शोधला असल्याचा ऑडिओमध्ये उल्लेख आहे. या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे एकच खळबळ उडाली आहे. ठाणे पालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचा हा आवाज असल्याचा आरोप आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दल आपण कोणतीही तक्रार दाखल करणार नसल्याचे म्हटलं आहे.