‘मी तर अजून अर्धचं बोललो आहे’ उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबई : भारतीय जनता पार्टीचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच मी अजित पवारांबरोबर शपथविधी घेतला होता, असं विधान फडणवीसांनी केलं.
फडणवीसांच्या या विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या सर्व घडामोडींनंतर देवेंद्र फडणवीसांनी आणखी एक वक्तव्य केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार आणि पहाटेच्या शपथविधीबाबत केलेल्या गौप्यस्फोटाबाबत विचारलं असता फडणवीस म्हणाले, मी अजून अर्धच बोललो आहे. दुसरी योग्य वेळ आल्यास उरलेलं जे काही आहे, ते सांगेन, असं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे.
पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी एवढंच सांगेन की, मी जे काही बोललो आहे, ते सत्य बोललो आहे. त्याचे वेगवेगळे अर्थ तुम्ही लोकांनी काढले. पण मी काय-काय बोललो? ते तुम्ही शांतपणे बसून ऐका. म्हणजे तुम्हाला त्याची प्रत्येक कडी जोडता येईल. त्यावेळच्या माझ्या पत्रकार परिषदा बघा, त्यावेळी मी काय-काय बोललो आहे, तेही बघा. त्या सर्व गोष्टी तुम्ही बघितल्या तर तुम्हाला दुसर्या पुराव्याचीदेखील गरज पडणार नाही.
“पण मी अजून अर्धच बोललो आहे. उरलेल जे काही अर्ध आहे, ते दुसरी योग्य वेळ आल्यानंतर उर्वरित अर्धदेखील बोलेल,” असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शिवाय फडणवीस आणखी काय बोलणार? याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत.
खरं तर, देवेंद्र फडणवीस आज पुण्यात आले होते. त्यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते व खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.