थेरगावकरांची साथ असल्याने अश्विनी जगताप यांचा विजय कोणी रोखू शकत नाही : रावसाहेब दानवे

0

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजप-शिवसेना मित्र पक्षाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या विजयासाठी थेरगावचे ग्रामस्थ एकवटले आहेत. सर्व थेरगाव ग्रामस्थांची केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत सोमवारी बैठक झाली. त्यामध्ये अश्विनी लक्ष्मण जगताप यांना मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही मतदानादिवशी जास्तीत जास्त मतदारांना बाहेर काढून मतदान करून घेण्याचे आवाहन थेरगाव ग्रामस्थांना केले.

थेरगाव येथीर बापुजीबुवा मंदिरात थेरगाव ग्रामस्थांनी घोंगडी बैठक झाली. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, थेरगावचे ग्रासस्थ व शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, शिवसेनेचे विधीमंडळातील पक्षप्रतोद भरत गोगावले, भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, माजी उपमहापौर झामाबाई बारणे, युवासेना शहरप्रमुख विश्वजीत बारणे, माजी नगरसेवक निलेश बारणे, अभिषेक बारणे, सिद्धेश्वर बारणे, माजी नगरसेविका मनिषा पवार, विमल जगताप, माजी प्रभाग स्वीकृत सदस्य संदिप गाडे, सामाजिक कार्यकर्ते तानाजी बारणे, काळुराम बारणे, करिष्मा बारणे, नरेंद्र माने, संतोष गुलाब बारणे यांच्यासह थेरगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे यांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी शहरात केलेल्या विकासकामांचा उल्लेख करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोटनिवडणूक ही संधी असल्याचे सांगितले. सर्व थेरगाव ग्रामस्थांनी एक होऊन त्यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी आपण सर्वांनी खांद्याला खांदा मिळवून काम करूया, असे आवाहन केले. माजी उपमहापौर झामाबाई बारणे यांनीही दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कामाचा गौरव केला. त्यांच्यासारखा नेता शहरात पुन्हा होणे नाही, अशा शब्दांत त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच आपण सर्व थेरगाव ग्रामस्थ एक असल्यामुळे अश्विनी लक्ष्मण जगताप यांचा विजय पक्का असल्याचा विश्वास व्यक्त केला.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विजयासाठी एकत्र आलेल्या थेरगाव ग्रामस्थांचे कौतुक केले. त्यांनी आयुष्यभर केलेल्या विकासकामांना थेरगाव ग्रामस्थांनी दिलेली ही पोचपावती असल्याचे ते म्हणाले. पोटनिवडणूक असल्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत कोणतीही कमी पडता कामा नये. त्यामुळे थेरगाव ग्रामस्थांनी येत्या रविवारी होणाऱ्या मतदानादिवशी प्रत्येक मतदाराच्या घरांपर्यंत जाऊन त्यांना मतदानासाठी बाहेर काढावे, असे आवाहन त्यांनी केले. थेरगाव ग्रामस्थ एक झाल्याने अश्विनी लक्ष्मण जगताप यांचा विजय कोणीही रोखू शकणार नसल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.