भाजपच्या हेमंत रासने सह दोन नगरसेवकांवर गुन्हा दाखल

0

 

पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघांमध्ये रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी मतदानासाठी जात असताना मतदान केंद्रात भाजपचे कमळाचे चिन्ह असलेले उपरणे परिधान केले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी आक्षेप घेत पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. याची दखल घेत पोलिसांनी हेमंत रासने यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

तसेच, मतदानाच्या दिवशी मालधक्का चौकात एका जागी पैसे वापट केल्याप्रकरणी आणि विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्या प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक गणेश बीडकर यांच्यासह चौघांवर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासोबतच गंजपेठेत पैसे वाटप आणि मारहाण केल्याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक विष्णु हरिहार यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा व्हिडिओही समोर आला होता.

हेमंत रासने यांच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात राष्ट्रादीच्या रुपाली पाटील यांनी तक्रार दिली होती. रूपाली पाटील यांनी त्यांच्या लेखी तक्रारीत सांगितले आहे की, कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू असताना मतदान केंद्रावर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी गळ्यात भाजप या पक्षाचे चिन्ह असलेली पट्टी घालून प्रवेश केला. तसेच त्यांनी मतदान केंद्रात प्रवेश करून मतदान केले. ही घटना सर्व माध्यमांनी चित्रित केली असून या प्रकारामुळे हेमंत रासने यांनी आचारसंहितेचा भंग केला असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

तक्रारीत रुपाली पाटील यांनी म्हटले आहे की, निवडणूक चिन्ह असलेली पट्टी घालून मतदान केंद्रावर 100 मीटरच्या आत हेमंत रासने स्वतः उमेदवार असतानाही, त्यांनी मतदान केंद्रावर प्रवेश कसा केला? त्यांना त्या ठिकाणी बंदोबस्त वर असलेले पोलिसांनी तसेच निवडणूक कर्मचारी यांनी प्रतिबंध का केला नाही? असा प्रश्न माझ्यासह सामान्य मतदारांना पडला आहे. म्हणून निवडणूक नियमावलीचे मतदानाच्या दिवशी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी उल्लंघन केले असल्याने या प्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी व त्यांची उमेदवारी रद्द करावी. तसेच, कर्तव्यात कसूर करणाऱ्या अन्य कर्मचाऱ्यांवरदेखील कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

मतदारांना पैसे वाटप तसेच कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी माजी नगरसेवक गणेश बीडकर, मयूर चव्हाण, नईम शेख, बाल शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, माजी नगरसेवक विष्णु हरिहार यांच्यावर याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी फैयाज शेख यांनी तक्रार दिली आहे. रविवारी मंगळवार पेठेतील आयशा कॉम्प्लेक्स मालधक्का चौक येथे ही घटना घडली.

Leave A Reply

Your email address will not be published.