बेकायदेशीर वास्तव प्रकरणी पाकिस्तानी तरुणाला अटक

0

पुणे : एका पाकिस्तानी तरुणास पुण्यात बेकायदेशीर वास्तव्य केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या पाकिस्तानी नागरिक पडताळणी विभागाचे विशेष शाखेने याबाबत तपास केला असता, सदर तरुणाने बनावट कागदपत्राआधारे पासपाेर्ट बनविण्याचे उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली.

मुहम्मद अमान अन्सारी (वय-22,सध्या रा.भवानी पेठ,पुणे, मु.रा.पाकिस्तान) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. याबाबत विशेष शाखेचे पोलिस शिपाई केदार प्रदीप जाधव (वय-31) यांनी खडक पोलिस ठाण्यात आराेपी विराेधात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आराेपी मुहम्मद अन्सारी याची आई भारतीय असून वडील पाकिस्तानी आहे. पाकिस्तान मध्ये त्याचे कुटुंबीय वास्तव्यास असतानाही ताे सन 2015 पासून आतापर्यंत भवानी पेठ येथे त्याच्या आज्जीकडे बेकायदेशीरपणे काेणत्याही वैध कागदपत्राशिवाय अवैधरित्या वास्त्वय करताना मिळून आलेला आहे. तसेच पाकिस्तानी नागरिक मुहम्मद अन्सारी असताना ही त्याने खाेटी कागदपत्रे वापरुन भारतीय पासपाेर्ट बनविला आहे. त्याचा वापर करुन त्याने पुणे ते दुबई असा प्रवास देखील केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर भादंवि कलम 420, 468, 471, विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 चे कलम 14 आणि पासपाेर्ट कायदा 1967 चे कलम 12 (1अ), (ए) नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. याबाबत पुढील तपास खडक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) एस तटकरे करत आहे.

खडक पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता यादव यांनी सांगितले की, आराेपी माेहम्मद अन्सारी हा बेकायदेशीररित्या भारतात वास्तव्य करताना मिळून आलेला आहे. याबाबत विशेष शाखेने त्याच्या कागदपत्रांची पडताळणी केली असता, त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे ताे पाकिस्तानचा रहिवासी असतानाही भारतीय पासपाेर्ट बनवून पुणे ते दुबई दरम्यान प्रवास केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणात हेरागिरीचा प्रकार अद्याप उघडकीस आलेला नसून बाेगस कागदपत्रे बनवणे आणि बेकायदेशीर वास्तव्य करणे हा अपराध आराेपीने केल्याचे दिसून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.