नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणीवेळी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पक्षांतर्गत असंतोषाच्या मुद्द्यावर राज्यपाल राज्य सरकारला बहुमत चाचणीचा आदेश कसा देऊ शकतात, असा सवाल करून उद्धव ठाकरेंकडे संख्याबळ नव्हते हे खरेय; परंतु बहुमत चाचणीचा आदेश देऊन सरकार कोसळेल असा विशिष्ट परिणाम साधण्यासाठी राज्यपाल आपल्या पदाचा वापर करू शकत नाहीत, अशा कडक शब्दांत घटनापीठाने ताशेरे ओढले.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाचसदस्यीय घटनापीठामध्ये न्या. शहा, न्या.कृष्णा मुरारी, न्या. हिमा कोहली आणि न्या.पी.एस.नरसिंह यांचा समावेश आहे. बुधवारी राज्यपालांच्या वतीने महाधिवक्ता तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला. त्या वेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी प्रश्नांचा भडिमार करीत महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि राज्यपालांची भूमिका याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. तीन वर्षांचा सुखी संसार एका रात्रीत कसा मोडला, असा सवाल करून महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे; परंतु अशा घटनांमुळे महाराष्ट्राबद्दल अतिशय वाईट मतप्रदर्शन करण्यात आले, असे ते म्हणाले. दरम्यान, मेहता यांच्या युक्तिवादानंतर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी पुन्हा युक्तिवाद सुरू केला. गुरुवारीही याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.
सरन्यायाधीश अन् राज्यपालांचे वकील तुषार मेहता यांच्यात झडलेल्या प्रश्नोत्तरांच्या फैरी
न्या. चंद्रचूड : नेमके काय घडले की राज्यपालांनी चाचणीचे आदेश दिले ?
अॅड.तुषार मेहता : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास नसल्याचे शिवसेनेच्या ३४ आमदारांचे पत्र, ठाकरे सरकारचा पाठिंबा काढल्याचे अपक्ष आमदारांचे पत्र तसेच विरोधी पक्षनेते (देवेंद्र फडणवीस) यांचे बहुमत चाचणीची मागणी करणारे पत्र अशा विविध घटना घडल्याने राज्यपालांनी चाचणीचे आदेश दिले. परंतु पराभव अटळ दिसत असल्याने उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
न्या. चंद्रचूड : विकास निधी अथवा पक्षाच्या तत्त्वाविरुद्ध वर्तन अशा मुद्द्यांवर आमदारांत असंतोष निर्माण होऊ शकतो. परंतु बहुमत चाचणीसाठी तो पुरेसा ठरतो का ? आमदार नाखुश आहेत, सरकार अल्पमतात आहे हे विरोधी पक्षनेता म्हणणारच. आमदारांची सुरक्षा धोक्यात आली आहे, असेही विरोधी पक्षनेत्याच्या पत्रात आहे. परंतु सुरक्षेचा मुद्दा हा बहुमत चाचणीचा आधार ठरू शकत नाही. पक्षाच्या आमदार – कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे असे ३४ आमदारांच्या ठरावात म्हटले आहे. उद्धव ठाकरेंकडे पुरेसे संख्याबळ नव्हते हेसुद्धा खरे. परंतु राज्यपालांनी इतरांच्या क्षेत्रात ढवळाढवळ करून खतपाणी घालू नये. सत्ताधारी पक्षांना लोक डिवचणार आणि राज्यपाल सत्ताधारी पक्षाचे सरकार पाडणार हे लोकशाहीचे अत्यंत विदारक चित्र आहे.
न्या. चंद्रचूड : काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत तीन वर्षे सुखी संसार चालला होता. मग अचानक एके दिवशी तुम्ही घटस्फोट घेण्याचे ठरवता. बंडखोरांपैकी काही मंत्रीही होते. मग एवढा दीर्घकाळ तुम्ही काय करीत होता आणि अचानक तुम्हाला काडीमोड का हवा आहे, असे प्रश्न राज्यपालांनी आमदारांना विचारायला पाहिजे होते. बंडखोर आमदारांनी केवळ गटनेता आणि प्रतोद नियुक्तीसाठी पत्र दिले होते. त्यामुळे हे पत्र बहुमत चाचणीसाठी पुरेसे नव्हते. तरीही राज्यपालांनी तसे गृहीत धरून बहुमत चाचणीचे आदेश दिले. राज्यपालांनी बहुमत चाचणीचा आदेश दिल्याने सरकार कोसळण्यास मदत झाली. एकदा सरकार स्थापन झाल्यावर राज्यात स्थिर सरकार असावे, अशी भूमिका घेणे हे राज्यपालांचे कर्तव्य आहे. मात्र, महाराष्ट्रात जे काही झाले ते अत्यंत चुकीचे होते. महाराष्ट्र हे अतिशय सुसंस्कृत राज्य म्हणून ओळखले जाते. मात्र, अशा घटनांमुळे अतिशय वाईट पद्धतीने बोलले गेले.
राज्यपालांनी बंडखोर आमदारांना निवडणूक आयोगाकडे पाठवावयास हवे होते : सिब्बल
राज्यपालांनी आमदारांना नव्हे तर राजकीय पक्षाला महत्त्व दिले पाहिजे. अन्यथा आयाराम-गयारामचे युग येईल. ३४ आमदार आयोगाकडे गेले असते तर आपोआप अपात्र झाले असते. पण त्या वेळी तसे झाले नाही. राज्यपालांनी त्यांना निवडणूक आयोगाकडे पाठवायला हवे होते, असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील अॅड.कपिल सिब्बल यांनी केला.
तर्कशुद्धपणे अन् न्यायिक कक्षेतच शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता : निवडणूक आयोग
अधिकारातच एकनाथ शिंदे यांच्या गटाला अस्सल शिवसेना पक्ष म्हणून मान्यता आणि धनुष्यबाण हे चिन्ह प्रदान करण्यात आले आहे. खटल्यातील गुणवत्तेबद्दल असे शपथपत्र केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केले. १७ फेब्रुवारी रोजीच्या आयोगाच्या आदेशाला उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिले आहे.