मुंबई : बुकी अनिल जयसिंघानीला मुंबई पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे. उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 1 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात अनिक्षा जयसिंघानीचे नाव समोर आल्यानंतर तिचे वडिल आणि बुकी अनिल जयसिंघानी यांचेही नाव पुन्हा एकदा चर्चेत आले होते.
अमृता फडणवीस फसवणूक प्रकरणी अनिल जयसिंघानी यांना गुजरातमध्ये अटक करण्यात आली आहे. थोड्यावेळात अनिल जयसिंघानीला घेऊन पोलिस मुंबईत दाखल होणार आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.
अनिल जयसिंघानी याचे देशभरातील राजकीय नेते आणि आयपीएस अधिकाऱ्यांशी संबंध असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. अनिल जयसिंघानी यांच्यावर गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, आसाम आणि गोवा या सहा राज्यांमध्ये एकूण 17 गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांमध्ये पोलीस अनिल जयसिंघानी यांचा शोध सुरु होता.
उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना तब्बल 1 कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न झाला. अमृता फडणवीस यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, अनिक्षा आणि त्यांची नोव्हेंबर 2021 साली पहिल्यांदा भेट झाली होती. अनिक्षाने सांगितले की, ती कपडे दागिन्यांची डिझायनर आहे. तिने डिझाईन केलेले कपडे आणि दागिने सार्वजनिक कार्यक्रमात घालावे अशी विनंती केली होती.
त्यानंतर 27 जानेवारी 2023 रोजी पुण्यातल्या एका कार्यक्रमात अनिक्षा भेटली. कार्यक्रम झाल्यावर अनिक्षाला कारमध्ये बसवले. तेव्हा बोलताना अनिक्षाने म्हटले की, तिचे वडील पोलिसांना बुकींबाबत माहिती देत होते. त्यानुसार, पोलिसांना सट्टेबाजांवर कारवाईच्या सूचना देऊन पैसे कमवू शकतो. कारवाई न करण्यासाठीही सट्टेबाजांकडून पैसे घेऊ शकतो. असे फडणवीस यांनी तक्रारीत म्हटले आहे.