संजय राऊत यांची शिवसेना संसदीय नेते पदावरून हकालपट्टी

0

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने गुरुवारी ठाकरे गटाला जोरदार झटका दिला. शिवसेनेने खासदार संजय राऊत यांची संसदीय नेतेपदावरून हकालपट्टी करत त्यांच्या जागी गजानन किर्तीकर यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीचे अधिकृत पत्र लोकसभा अध्यक्षांना सोपवण्यात आले आहे.

उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांची शिवसेनेच्या संसदीय नेतेपदी नियुक्ती केली होती. त्यासंबंधीचे नियुक्तीपत्र त्यांनी लोकसभेच्या तत्कालीन अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना पाठवले होते. पण शिवसेनेच्या बंडाळीनंतर ठाकरे व शिंदे गटातील संघर्ष टोकाला गेला आहे. खासदार संजय राऊत यांनी ठाकरे गटातर्फे किल्ला लढवताना मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. त्यांच्या या टिकेला ब्रेक लावण्यासाठी त्यांची संसदीय नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र पाठवले आहे. त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, ’21 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबई येथे शिवसेना कार्यकारिणीची बैठक पार पडली. त्यात संजय राऊत येथून पुढे संसदेतील शिवसेना पक्षाचे नेते नसतील असा एकमताने निर्णय घेण्यात आला. त्यांच्या जागी गजानन किर्तीकर यांची या पदावर निवड केली जावी. आमच्याकडे बहुमत असल्याने, संजय राऊत यांना या पदावरून दूर केले जावे.’

शिवसेनेतील बंडळीनंतर शिवसेनेचे 40 हून अधिक आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले. त्यानंतर लोकसभेतील 18 पैकी 13 खासदारही शिंदे गटात सहभागी झाले. त्यानंतर शिंदेंनी शिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची नियुक्ती केली होती. आता संजय राऊत यांच्या जागी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांची संसदीय नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

गत काही दिवसांपूर्वीच गजानन किर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन शिंदेंची भेट घेतली होती. त्यानंतर मुंबईत आयोजित एका त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता. पुढील काही महिन्यांत मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे किर्तीकर यांचा शिंदे यांना पाठिंबा हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.