मुंबई : शिंदे फक्त मुखवटा राज्य फडणवीसच करतात, अशाप्रकारचा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँगेसचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून सध्या भाजप व शिवसेना आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर टीकेचे आसूड ओढले. मात्र, ही पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यामुळे विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाले आहे.
जयंत पाटील यांनी वाचू का प्रकरणावरुनच मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. ते म्हणाले, लिहिलेले वाचून दाखवण्यासाठी देखील शेजाऱ्याची आज्ञा घ्यावी लागते, अशी आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावर पाळी आलेली आहे. शिंदे गट आणि भाजप एकत्र आल्याने शिंदे गटाचे रेटिंग कमी झालेच मात्र त्यासोबतच भाजपचेही रेटिंग कमी झाले. भाजपची लोकप्रियता कमी झालेली आहे. असंगाशी संग केल्यावर काय होते याचा अनुभव सध्या भाजप घेत आहे.
जयंत पाटील म्हणाले, भाजपला राज्यातली जनताच त्यांची जागा दाखवेल. शिवसेनेच्या बाबतीत बोलायचे झाले तर शिंदेगटाला आणि उद्धव ठाकरेंना जनतेचा किती पाठिंबा आहे हे मालेगावच्या सभेत दिसून आले.
देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्रित पत्रकार परिषदेला आले तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या हातात एक कागद होता. पत्रकार परिषद सुरू होईपर्यंत एकनाथ शिंदे तो कागद वाचत होते. पत्रकार परिषदेला सुरुवात करायची तोच एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांच्या कानात हळूच विचारले की, वाचू का?. त्यावर ‘नाही, वाचण्याची काही गरज नाही’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे तोपर्यंत वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे सुरू झाले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमधील ही कुजबूज कॅमेऱ्यातही कैद झाली.
एकनाथ शिंदे हे भाजपने लिहून दिलेले स्क्रिप्ट वाचतात, असा आरोप नेहमीच केला जातो. त्यामुळे या व्हिडिओमुळे विरोधकांच्या हातातही आयते कोलीत मिळाले आहे. या व्हिडिओवरुन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना जोरदार चिमटा काढला आहे. संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदेंना अजूनही देवेंद्र फडणवीसांची परवानगी घ्यावी लागते. हीच तर गुलामी आहे. आणि याच गुलामीविरोधात स्वातंत्र्यवीर सावरकर लढले होते.